एकेकाळी एकहाती काँग्रेसची सत्ता; आता भाजप - राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढत, 'मविआ'चा निभाव लागणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 10:10 IST2025-12-16T10:10:04+5:302025-12-16T10:10:44+5:30
पुण्यात राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एकत्र निवडणूक लढवावी, अशी मागणी दोन्ही गटातील कार्यकर्ते करत आहेत.

एकेकाळी एकहाती काँग्रेसची सत्ता; आता भाजप - राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढत, 'मविआ'चा निभाव लागणार का?
पुणे : महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. तर भाजप, रिपाइं आणि शिवसेना (शिंदे गट) हे एकत्रित निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजपपुढे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महाविकास आघाडीचा निभाव लागणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पुणे महापालिकेत २०१७ साली भाजपची एकहाती सत्ता आली होती. त्यानंतर २०२२ मध्ये महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपली. पण निवडणुका झाल्या नाही. त्यामुळे गेली साडेतीन वर्ष पालिकेवर प्रशासकराज आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर राज्यात शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार गट तसेच शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट तयार झाले आहेत. त्यानंतर राज्यातील राजकीय चित्र बदलत गेले आहे. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक झाली. यामध्ये महायुतीने बाजी मारली आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेत बसले.
पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे समोरासमोर येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एकत्र निवडणूक लढवावी, अशी मागणी दोन्ही गटातील कार्यकर्ते करत आहेत. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास काही पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. मात्र २०१७च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना ३९ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर दोन अपक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे ३१, तर शरद पवार गटाकडे १० माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची ताकद शहरात जास्त आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास ते भाजपला काही प्रमाणात का होईना रोखणे शक्य होणार आहे. परंतु दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळ्या लढल्यास भाजपलाच फायदा होण्याची शक्यता अधिक आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविलेला आरपीआय आता स्वत:च्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास आग्रही आहे. शिवसेनेचा शिंदे गट भाजपबरोबर युती करून लढण्यासाठी प्रयत्नशील आहे.
२०१७च्या पालिका निवडणुकीत शिवसेनेेचे १० नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाकडे तीन माजी नगरसेवक राहिले आहेत. पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये गेले आहेत. एक माजी नगरसेवक काँग्रेसमध्ये गेला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाकडे एक तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून आलेेले प्रत्येकी एक असे एकूण तीन माजी नगरसेवक आहेत. पुणे महापालिकेत एकेकाळी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. पण २०१७च्या निवडणुकीत काँग्रेसचे ९ नगरसेवक निवडून आले होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणे शहरात काँग्रेसला यश मिळालेले नाही. काँग्रेसचा एकही आमदार पुणे शहरात नाही. त्यामुळे पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पूर्ण ताकदीनिशी उतरावे लागणार आहे. शिवसेनेचा ठाकरे गट आणि मनसेचे यांच्या युतीसाठी प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीत मनसेला घेण्यास काँग्रेसचा अप्रत्यक्षरीत्या विरोध आहे. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेवर मनसेचे महाविकास आघाडीत समावेश होणे अवलंबून राहावे लागणार आहे.
कमी कालावधी असल्यामुळे सर्व पक्षाचा कस लागणार
महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी अवघे ३० दिवसांचा कालावधी मिळत आहे. या कमी कालावधीत सर्वपक्षांना निवडणुकीचे टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी कस लागणार आहे.
पुणे महापालिका निवडणूक २०१२
पक्षीय बलाबल
एकूण जागा - १५२
राष्ट्रवादी - ५१
मनसे - २९
काँग्रेस - २८
भाजप - २६
शिवसेना - १५
आरपीआय - ०२
अपक्ष - ०१
पुणे महापालिका निवडणूक २०१७ पक्षीय बलाबल
एकूण जागा - १६२
भाजप आरपीआय युती - ९७
राष्ट्रवादी - ३९
शिवसेना - १०
काँग्रेस - ०९
मनसे - ०२
एमआयएम - ०१
अन्य - ०४