दीनानाथच्या निमित्ताने भाजपतील दुखऱ्या नसा उघड; गटबाजी अधिकच वाढण्याची चिन्हे

By राजू इनामदार | Updated: April 12, 2025 19:34 IST2025-04-12T19:33:13+5:302025-04-12T19:34:23+5:30

पक्षाची पारंपरिक मतपेढी या प्रकरणात दुखावली गेली असल्याने पक्षाचे जुन्या पिढीतील ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते चिंतित झाले आहेत

On the occasion of Dinanath mangeshkar hospital the painful nerves in BJP are exposed Signs of increasing factionalism | दीनानाथच्या निमित्ताने भाजपतील दुखऱ्या नसा उघड; गटबाजी अधिकच वाढण्याची चिन्हे

दीनानाथच्या निमित्ताने भाजपतील दुखऱ्या नसा उघड; गटबाजी अधिकच वाढण्याची चिन्हे

पुणे : लोकसभा, विधानसभेत यश, दिल्लीत सरकार, राज्यात सरकार, झालेच तर महापालिकेतही अघोषित सत्ता असे असूनही भारतीय जनता पक्षात सारे काही आलबेल नाही. दीनानाथ रुग्णालयातील गर्भवती मातेबाबत झालेल्या निष्काळजीपणाच्या निमित्ताने अनेकांच्या दुखऱ्या नसा उघड झाल्या, तर काहीजणांच्या जुन्या जखमेवरच्या खपल्या निघाल्या. नेतेच गटबाजी करत असल्याचे उघड झाल्याने आता कार्यकर्त्यांचेही कंपू होऊ लागले असून त्यांच्यात चर्चा सुरू झाल्या आहेत.

पक्षाच्या महिला आघाडीने दीनानाथ रुग्णालयातील त्या प्रकरणात असलेल्या एका डॉक्टरांच्या वडिलांचा दवाखाना फोडला. वडिलांचा दवाखाना व संबंधित डॉक्टर यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसताना ही कृती झाली. त्यादिवशी दीनानाथच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांची झुंबडच इतकी उडाली होती की, त्यापेक्षा काही वेगळे करावे म्हणून की काय पण महिला आघाडीने ही कृती केली. पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी त्यावरून थेट शहराध्यक्षांना पत्र लिहित या आघाडीचे कान टोचले. पक्षाची प्रतिमा तयार करताना अनेक वर्षे लागतात तर ती प्रतिमा बिघडवण्यासाठी असे एखादेच कारण पुरते, त्यामुळे महिला आघाडीला समज द्यावी असे त्यांचे म्हणणे.

त्यांनी शहराध्यक्षांना लिहिलेले हे पत्र उघड झाले आणि त्यातून भाजपतील ही सुप्त असणारी गटबाजी उघड झाली. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी ही तर महिला आघाडीची स्वाभाविक प्रतिक्रिया होती असा बचाव करत त्यांची पाठराखण केली. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तर पक्षाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व राज्याचे उच्च शिक्षणमंत्री व कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील यांनीही त्यांचीच री ओढली. त्यातून खासदार कुलकर्णी एकट्या पडल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र तरीही त्यांनी आपण आपल्या मताशी ठाम असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर परत त्याच गर्भवती माता प्रकरणातील डिपॉझिट व इस्टिमेट या दोन शब्दांवरून खासदार कुलकर्णी यांना लक्ष्य करण्यात आले. त्यांनी तोही हल्ला ठामपणे परतवून लावला व दोन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे होतात असे स्पष्ट केले.

खासदार कुलकर्णी कोथरूडच्या आमदार होत्या. त्यांना उमेदवारी नाकारून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. सलग ५ वर्षे काहीही कारण नसताना शांत बसावे लागल्याने मेधा कुलकर्णी यांनी वेळोवेळी आपला रोष प्रकट केला. त्यानंतर त्यांना पक्षाकडून थेट राज्यसभेची उमेदवारी मिळाली. स्थानिक कोणाबरोबरही सल्लामसलत न करता थेट वरूनच त्यांना ही उमेदवारी मिळाल्याची चर्चा त्यावेळी होती. कुलकर्णी खासदार झाल्या. त्यांना राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयकासंबंधी काम करण्याची जबाबदारी पक्षाने दिली. ती त्यांनी पार पाडली. तोपर्यंत दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात खासदार कुलकर्णी यांचे नाव झाले.

त्यातूनच की काय त्यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न शहरामधून सुरू असल्याचे आता पक्षाच्या वर्तुळात बोलले जात आहे. त्यातूनच शहराध्यक्ष घाटे बरोबर असल्याचे नेत्यांनी सांगितले असल्याची चर्चा आहे. एरवी दीनानाथ प्रकरणात त्यांनी मांडलेला मुद्दा पक्षाच्या प्रतिमेशी संबंधित असतानाही, तो मान्य करण्याऐवजी शहराध्यक्षांची पाठराखण करणे झाले नसते असे पक्षातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पक्षात ही गटबाजी होतीच, पण ती सुप्त स्वरूपात होती, दीनानाथच्या निमित्ताने ती उघड झाल्याचे हे कार्यकर्ते सांगतात.

पक्षाची पारंपरिक मतपेढी या प्रकरणात दुखावली गेली असल्याने पक्षाचे जुन्या पिढीतील ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते चिंतित झाले आहेत. त्यांचे दुखरेपण कमी करण्याचा प्रयत्न खासदार कुलकर्णी यांनी केला, मात्र ते लक्षात न घेता त्यांनाच मात देण्याचा प्रयत्न काहीजणांकडून झाला. त्यामुळे गटबाजी अधिकच वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

Web Title: On the occasion of Dinanath mangeshkar hospital the painful nerves in BJP are exposed Signs of increasing factionalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.