भानुदास पऱ्हाड
आळंदी : पुणे जिल्ह्यातील सुमारे १०० शाळांनी स्वीकारलेला ‘ओळख ज्ञानेश्वरीची’ हा संस्कारक्षम उपक्रम आता संत निवृत्तीनाथांच्या नाशिक भूमीत दाखल झाला आहे. शहरातील चार शाळांमध्ये उपक्रमाला प्रारंभ झाला असून, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासाबरोबरच सांप्रदायिक अभ्यास प्रामाणिकपणे करण्याची ग्वाही दिली.
आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, आळंदी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ हा उपक्रम सुरू केला आहे.
मराठा हायस्कूलमध्ये ‘लोकमत’ची कात्रणे
मराठा हायस्कूलच्या भिंतीवर दैनिक ‘लोकमत’ने माउलींच्या आषाढी-परिवारी प्रस्थान सोहळ्याचे आकर्षक फोटोसह प्रसिद्ध केलेले वृत्तकात्रण काचेत जतन केले आहे. विद्यार्थ्यांना हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवता न आल्यास त्याची अनुभूती मिळण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात यांनी सांगितले.
पाच वर्षे सुरू आहे उपक्रम
गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम पुणे जिल्ह्यातील सुमारे शंभर शाळांमध्ये राबवला जात आहे. संत मुक्ताईंच्या भूमीनंतर आता संत निवृत्तीनाथांच्या नाशिकमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, मराठा हायस्कूल, वाघ गुरुजी हायस्कूल आणि जनता विद्यालय पवननगर येथे या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी आणि हरिपाठाचे धडे दिले जातात. यावेळी सार्थ ज्ञानेश्वरी, पारायण ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. सुभाष महाराज गेठे, अजित वडगावकर आणि प्रा. गजानन आंभोरे यांनी शालेय जीवनातील संस्कारांचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्या दिल्या.