पुणे : विना मास्क घराबाहेर पडणे आता पुणेकरांना महागात पडणार आहे. शहर पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला असून, नऊ दिवसातच (२ ते १० सप्टेंबर) २७ हजार ९८९ पुणेकरांकडून १ कोटी ४० लाख दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडला की मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग वाढत असूनही अद्याप पुणेकरांमध्ये गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहर पोलीस प्रशासनाला कारवाईचे शस्त्र उगारणे अनिवार्य ठरले आहे. त्यानुसार जर चेहर्यावर मास्क नसेल तर बाहेर फिरणे पुणेकरांना महागात पडणार आहे. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत आणि स्थानिक पोलिसांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या आता कोणत्याही सबबींना थारा दिला जाणार नाही. ८ सप्टेंबर पर्यंत पोलिसांनी १५ हजार २०६ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७६ लाख ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला होता..एका दिवसातच हा आकडा 1 कोटीच्या घरात पोहोचला आहे. विना मास्क कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेने पोलिसांना प्रदान केले आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी वाहतूक शाखेकडून केला जाणारा हा दंड शासन तिजोरीत जमा केला जात आहे. या कारवाईला सामोरे जायचे नसल्यास बाहेर पडताना मास्क वापरण्याचे आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे......
अबब ! एवढे बेशिस्त अन् तेही पुण्यात, नऊ दिवसांत विना मास्क फिरणाऱ्या २८ हजार जणांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 14:22 IST
विना मास्क घराबाहेर पडणे आता पुणेकरांना महागात पडणार;१ कोटी ४० लाखांचा दंड वसूल
अबब ! एवढे बेशिस्त अन् तेही पुण्यात, नऊ दिवसांत विना मास्क फिरणाऱ्या २८ हजार जणांवर कारवाई
ठळक मुद्देवाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी वाहतूक शाखेकडून केला जाणारा दंड शासन तिजोरीत जमा