अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त भत्ते होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 01:05 IST2019-01-09T01:05:04+5:302019-01-09T01:05:33+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : समितीचा अहवाल स्वीकारला

अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त भत्ते होणार बंद
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाºयांना वेतनाव्यतिरिक्त दिले जाणारे अतिरिक्त भत्ते बंद करण्याची समितीने केलेली शिफारस विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने स्वीकारली आहे. त्याची अंमलबजावणी येत्या १ एप्रिल २०१९ पासून केली जाणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाºयांना वेतनाव्यतिरिक्त दूरध्वनी भत्ता, वाहनभत्ता, सुपरवायझरी भत्ता, परीक्षा विभागात काम करण्याचा गोपनीय भत्ता आदी असंख्य भत्त्यांची खैरात केली जात असल्याच्या तक्रारी विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. याबाबतची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. समितीने या अतिरिक्त भत्त्यांची पडताळणी केली असता यातील अनेक भत्ते अतिरिक्त ठरत असल्याचे निष्पन्न झाले. ज्या कामासाठी अधिकारी व कर्मचाºयांची नेमणूक झाली आहे, त्याच कामासाठी त्यांना पुन्हा अतिरिक्त भत्ते देणे नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार हे भत्ते बंद करण्याची शिफारस समितीने केली होती. व्यवस्थापन परिषदेपुढे समितीचा हा अहवाल ठेवण्यात आला. परिषदेने हा अहवाल स्वीकारून त्याची १ एप्रिल २०१९ पासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांना फूड मॉलमध्ये मिळणार आवडीनुसार खाद्यपदार्थ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विधी विभागाजवळच्या मैदानावर प्रशस्त फूड मॉल उभारण्यात येणार आहे. या फूड मॉलमध्ये आठ स्टॉल असतील. या स्टॉलमध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जातील. येत्या ४ ते ५ महिन्यांत या फूड मॉलची उभारणी होणार आहे. एकाच वेळी तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी येथे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतील. विद्यापीठातील वसतिगृहामध्ये राहणाºया विद्यार्थ्यांना खाण्या-पिण्याबाबत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, या पार्श्वभूमीवर फूड मॉलमुळे त्यांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
येत्या वर्षभरात उभे राहणार
तीन हजार आसनक्षमतेचे सभागृह
४सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीच्या शेजारील मैदानावर ३ हजार आसनक्षमतेचे प्रशस्त सभागृह येत्या वर्षभरात उभे राहणार आहे. या सभागृहाच्या बांधकामाबाबतचा प्रस्ताव हेरिटेज विभागाकडे पाठविण्यात आला आहे, त्याची मंजुरी मिळताच लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे विद्यापीठातील विविध कार्यक्रमांसाठी एक मोठे सभागृह कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे. पदवीप्रदान आणि वर्धापनदिनासाठी विद्यापीठाच्या पाठीमागील मैदानावर मांडव घालावा लागतो. त्यासाठी विद्यापीठाचे वर्षाला लाखो रुपये खर्च होतात. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे कायमस्वरूपी सभागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठाचा मांडवासाठी दरवर्षी होणाºया खर्चामध्येही बचत होणार आहे.
पदनामबदलातील वाढीव वेतन बंद होणार
1 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाºयांनी राज्य शासनाची मान्यता न घेता परस्पर पदनाम बदलून वेतनश्रेणीमध्ये मोठी वाढ करून घेतली होती. ही वेतनवाढ थांबवून त्यांना पुन्हा मूळ पदांवर पाठविण्याचे, तसेच त्यांच्या वेतनाची वसुली करण्याचे आदेश राज्य शासनाने १७ डिसेंबरला एक परिपत्रक काढून दिले आहेत.
2 मात्र त्या अधिकारी व कर्मचाºयांना डिसेंबर महिन्याचे वेतन अदा करताना पुन्हा वाढीव वेतन देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीमध्ये वाढीव वेतन लगेच कमी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे. पदनामबदलातील अधिकारी व कर्मचाºयांचे पुढील महिन्यापासून वाढीव वेतन मिळणार नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.