श्रीमंत दगडूशेठ गणपतीला २२५ किलोचा बुंदीचा मोदक अर्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 18:01 IST2022-09-06T17:58:09+5:302022-09-06T18:01:17+5:30
थायलंडमधील गणेशभक्तांची गणेशमूर्ती घेऊन उत्सवमंडपात भेट...

श्रीमंत दगडूशेठ गणपतीला २२५ किलोचा बुंदीचा मोदक अर्पण
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे उत्सवाच्या १३० व्या वर्षी प्रभात फरसाण हाऊसच्या मालाणी परिवार तर्फे २२५ किलो बुंदीचा मोदक श्रीं ना अर्पण करण्यात आला. श्रीं समोर नैवेद्य दाखवून हा मोदक प्रसाद म्हणून भक्तांना देण्यात आला.
मालाणी परिवाराचे दीपक मालाणी व निखील मालाणी यांनी हा मोदक अर्पण केला. साजूक तूप, केसर, मोतीचूर, ड्रायफ्रूट वापरुन हा मोदक साकारण्यात आला होता. तसेच महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाकडून राबविण्यात येणा-या उपक्रमाद्वारे उत्सवात परदेशी व भारताच्या विविध राज्यांतील पर्यटक दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सवाला भेट देत आहेत. गणेशोत्सवाचा वारसा आणि संस्कृती जगभरातील लोकांना जाणून घेता यावी आणि ही संस्कृती जगभर पोहोचावी, यासाठी पुण्यातील गणेशोत्सवात राज्याच्या पर्यटन विभागातून परदेशी व विविध राज्यांतील नागरिकांना सहभागी करुन घेतले जात आहे.
याअंतर्गत थायलंड येथील ७० गणेशभक्तांनी एकाच वेळी उत्सवमंडपात येऊन गणरायाची आरती केली. थायलंड येथून आणलेल्या गणेशमूर्ती समोर ठेऊन त्यांनी आरती केली. आम्ही दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्याकरिता येतो. मागील दोन वर्षे कोविड संकटामुळे येता आले नाही. मात्र, यावर्षी निर्बंधमुक्त उत्सव साजरा होत असल्याने आम्हालाही दर्शनाचा आनंद घेता आला, अशी भावना या थायलंडच्या भक्तांनी व्यक्त केली.