किरण शिंदे
पुणे : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात अंगणात झोपलेल्या रवींद्र काशिनाथ काळभोर (वय ४५) या व्यक्तीचा डोक्यात दगडाने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली होती. अवघ्या तीन तासात लोणी काळभोरपोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. मयत रवींद्र काळभोर यांच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शोभा रविंद्र काळभोर (वय ४२) आणि गोरख त्रंबक काळभोर (वय ४१) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
लोणी काळभोर परिसरातील वडाळे वस्ती येथे रविंद्र काशीनाथ काळभोर वय ४५ हे त्यांच्या राहत्या घराबाहेर पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात केली होती. तपासा दरम्यान आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता मयत रवींद्र काळभोर यांची पत्नी शोभा काळभोर आणि गोरख काळभोर यांचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला मात्र त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला.
शोभा आणि गोरख या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. मात्र या दोघांमध्ये मयत रवींद्र काळभोर अडथळा ठरत होते. त्यामुळे या दोघांनी मिळून रवींद्र काळभोर यांचा काटा काढण्याचे ठरवले. सोमवारी रात्री रवींद्र काळभोर ही घराबाहेर पलंगावर झोपले होते. त्यावेळी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आरोपी गोरख काळभोर याने खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने डोक्यात वार करून ठार केले. त्यानंतर काही घडलेच नाही अशा अविर्भावात हे दोघेही वावरत होते. मात्र अवघ्या तीन तासात पोलिसांनी त्यांचा बनाव उघडा पाडला आणि दोघांनाही अटक केली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, उदय काळभोर, सर्जेराव बोबडे, दिगंबर सोनटक्के, पूजा माळी, यांच्यासह पोलीस कर्मचारी देवीकर, शिंदे, वनवे, जोहरे, नवले, होले यांच्या पथकाने केली.