पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या एकाने तेथील मुलींकडे बघून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुरुवारी (दि. २७) चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अनोळखी व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत, तात्काळ पोलिस ठाण्यातील दोन विशेष पथकांद्वारे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला ताब्यात घेतले. अनिल वसंत गायकवाड (२४, सध्या रा. विद्यापीठ होस्टेल, मूळ रा. कवडेनगर, नवी सांगवी) असे संशयिताचे नाव आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींकडे बघून अनोळखी व्यक्तीने अश्लील वर्तन केल्याची घटना मंगळवारी (दि. २५) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली होती. यानंतर संबंधित विद्यार्थिनींनी विद्यापीठ प्रशासनाकडे घडलेल्या घटनेची तक्रार केली होती. त्यानंतर गुरुवारी पोलिसांनी या घटनेसंबंधात तक्रार प्राप्त झाली. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. गुन्हा दाखल होताच दोन तासात पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.
सावित्रीबाई फुले पुरे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या समोर जेवण करून तीन विद्यार्थीनी रिफेक्टरीकडून मुलींच्या हॉस्टेलकडे जात होत्या. त्यावेळी मराठी भाषा विभागाबाहेर एका व्यक्तीने त्यांच्याकडे बघून अश्लील वर्तन केले. दोघींनी त्या व्यक्तीला जाब विचारण्यास सुरुवात केली तर एकीने तातडीने आंबेडकर भवनजवळील सुरक्षारक्षकाकडे धाव घेतली. परंतु नंतर तो व्यक्ती पळून गेल्याचे त्यांनी सांगितले. त्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. गुन्हा दाखल होताच दोन तासात पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले.