मराठ्यांचे ओबीसी आरक्षण अंतिम टप्प्यात, कुणबीच्या नोंदी लाखोंनी सापडल्या - मनोज जरांगे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 20:05 IST2023-11-16T20:01:01+5:302023-11-16T20:05:00+5:30
जरांगे पाटील यांची ऐतिहासिक जनसंवाद यात्रा सुरु आहे.

मराठ्यांचे ओबीसी आरक्षण अंतिम टप्प्यात, कुणबीच्या नोंदी लाखोंनी सापडल्या - मनोज जरांगे पाटील
सुपे (बारामती) : मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आला असुन शासनाला कायदा पारीत केल्याशिवाय पर्याय राहिला नाही असे प्रतिपादन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले. येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास जरांगे पाटील यांनी पुष्पहार घालुन मराठा समाजाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
जरांगे पाटील यांची ऐतिहासिक जनसंवाद यात्रा सुरु आहे. त्यामुळे वरवंड येथील सभा आटोपुन सुप्यामार्गे मोरगाव, जेजुरी कडे जात असताना सुप्यात सकळ मराठा क्रांती मोर्चा सुपे परगना यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जरांगे पाटील यांचे स्वागत सकळ मराठा समाजच्यावतीने करण्यात आले. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की अ. नगर मध्ये साडेतीन लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे २४ डिसेंबरचा दिवस उजाडेपर्यत आपल्याला आरक्षण सरकारला द्याव लागणार आहे. मात्र राजकारण, मतभेद आणि आंदोलने शांततेत करा आणि कोणीही आत्महत्या करु नका आरक्षण आपल्याला मिळणार आहे.
आत्तापर्यंत अनेक पक्षातील साहेब मोठे केले आहे. त्यामुळे आरक्षण मिळेपर्यत एकच पक्ष राहु द्या. ते म्हणजे स्वत:चे नशिब आणि आरक्षण. माझ्या जिवात जिव असेपर्यंत मी तुम्हाला आरक्षण मिळवु देणार आहे. आरक्षणाची सद्या ७० टक्के लढाई जिंकली असुन अद्याप ३० टक्के लढाई शिल्लक आहे. त्यामुळे येत्या १ डिसेंबर पासुन आंदोलणाची दिशा बदलुन प्रत्येक खेड्यापाड्यात गावोगावी मराठा समाजाने साखळी उपोषण शांततेत करावे. अगदी एक घर असले तरी त्याने स्वत:च्या गोठ्यात साखळी उपोषण करुन मराठा आरक्षणाची ताकद सरकारला दाखवुन द्यायची आहे. तसेच मऱाठा समाजाने व्यसनापासुन लांब राहण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले.