थंडीत आवर्जून खावी अशी पौष्टिक आणि चटकदार तिळाची चटणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 18:10 IST2019-12-09T18:09:24+5:302019-12-09T18:10:24+5:30
थंडीत शरीरातील उष्णता वाढवणारा पदार्थ म्हणजे तिळाची चटणी. ही झटपट होणारी लालजर्द चटणी पोळी, भाकरी किंवा गरम भातासोबतही तोंडी लावता येते. चला तर बघूया या तिळाच्या चटणीची पाककृती.

थंडीत आवर्जून खावी अशी पौष्टिक आणि चटकदार तिळाची चटणी
पुणे : थंडी म्हटली काजू बदाम आणि इतर सुकामेवा घातलेले लाडू, कुळीथाचे शेंगोळे, गुळपोळी असे अनेक पदार्थ आवर्जून केले जातात. कोकण भागात भांबुर्डयाचा पाला वापरून पोपटीही केली जाते. असाच थंडीत शरीरातील उष्णता वाढवणारा पदार्थ म्हणजे तिळाची चटणी. ही झटपट होणारी लालजर्द चटणी पोळी, भाकरी किंवा गरम भातासोबतही तोंडी लावता येते. चला तर बघूया या तिळाच्या चटणीची पाककृती.
साहित्य :
- भाजलेले पांढरे तीळ अर्धा वाटी
- भाजलेले खोबरे पाव वाटी
- भाजलेले शेंगदाणे पाव वाटी
- लसूण पाकळ्या १० ते १२
- लाल तिखट दोन चमचे
- मीठ चवीनुसार
- साखर पाव चमचा
- जिरे पाव चमचा
कृती :
- तव्यात एका पाठोपाठ तीळ, खोबरे, शेंगदाणे घालून लालसर भाजून घ्या.
- आता मिक्सरच्या भांडयात लसूण, लाल तिखट, साखर, मीठ, जिरे घालून एकजीव होईपर्यंत बारीक करून घ्या.
- आता या मिश्रणात तीळ, खोबरे आणि शेंगदाणे घालून एक ते दोन वेळा फिरवून घ्या.
- ही चटणी जाडसर ठेवावी. चवीला छान लागते. शिवाय तीळ दाताखाली आलेली उत्तम लागतात. लालचुटुक रंगाची तिळकुटाची चटणी खाण्यास तयार आहे.
- ही चटणी फ्रीजबाहेरही आठवडाभर सहज टिकते.