Pune Corona News: शहरात कोरोनाबाधितांच्या वाढीचा आकडा थांबेना; शुक्रवारी तब्बल ४१२ नवे रूग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 18:41 IST2021-12-31T18:40:56+5:302021-12-31T18:41:13+5:30
राज्य शासनाच्या निर्देषानुसार ज्या शहरात बाधितांची टक्केवारी (शंभर तपासणीमागे बाधितांची संख्या) ५ टक्क्यांच्यावर जाते, त्या शहरात निर्बंध अधिक कडक करण्याचा अधिकार हा स्थानिक प्रशासनाला आहे

Pune Corona News: शहरात कोरोनाबाधितांच्या वाढीचा आकडा थांबेना; शुक्रवारी तब्बल ४१२ नवे रूग्ण
पुणे : शहरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस शंभरच्या घरातच वाढत असून, शुक्रवारी (दि़३१) तब्बल ४१२ नवे रूग्ण आढळून आले असून, तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ६ टक्क्यापर्यंत गेली आहे. राज्य शासनाच्या निर्देषानुसार ज्या शहरात बाधितांची टक्केवारी (शंभर तपासणीमागे बाधितांची संख्या) ५ टक्क्यांच्यावर जाते, त्या शहरात निर्बंध अधिक कडक करण्याचा अधिकार हा स्थानिक प्रशासनाला आहे.
पुण्यात गेल्या दहा दिवसांपासून ही टक्केवारी अडीच टक्क्यांवरून चार, साडेचार व पाच तर आता सहा टक्क्यांवर गेली आहे. सन २०२१ च्या सरत्या वर्षात अखेरच्या पंधरा दिवसात कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले असून, नवीन वर्षात निर्बंध टाळण्यासाठी योग्य खबरदारी व गर्दी टाळणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टसिंग आदी उपाययोजना अनिवार्य बनल्या आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिवसभरात ६ हजार ९४४ जणांनी कोरोना चाचणी करून घेतली असून, यापैकी ५.९३ टक्के रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दिवसभरात ९५ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, शहरातील रूग्ण संख्या १ हजार ७९९ इतकी झाली आहे.
शहरात २५ डिसेंबरनंतर गेल्या सहा दिवसात ८२७ नव्या सक्रिय रूग्णांची वाढ झाली आहे. दोन जणांचा मृत्यू झाला असून हे दोघेही पुण्याबाहेरील आहेत. सध्या विविध रुग्णालयात ९२ गंभीर रुग्णांवर तर, ५६ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत ३८ लाख ६५ हजार ११३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातील ५ लाख १० हजार २१८ जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी ४ लाख ९९ हजार ३०३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरात ९ हजार ११६ जणांचा मृत्यू झाला आहे.