आता पुण्यात वस्ती तिथे लसीकरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 07:50 PM2021-06-29T19:50:02+5:302021-06-29T19:51:42+5:30

ऑनलाईन नोंदणी करून लस घेणे अडचणीचे ठरत असलेल्या पुणेकरांसाठी विशेष मोहीम

Now vaccination drive in Punes slums | आता पुण्यात वस्ती तिथे लसीकरण!

आता पुण्यात वस्ती तिथे लसीकरण!

Next

 ऑनलाईन नोंदणी करून कोरोना लस घेणे अडचणीचे ठरत असलेल्या झोपडपट्टीवासियांसाठी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील झोपडपट्टयांमध्ये राहाणार्‍या नागरिकांना त्यांच्याच वस्तीमध्ये जावून लसीकरण करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विशेष मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

     शहरात साडेचारशेहून अधिक झोपडपट्टया असून सुमारे ८ लाख नागरिक राहातात. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये सर्वाधिक संसर्ग हा झोपडपट्टया आणि वसाहतींमध्येच झाला होता. परंतू कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर मात्र हा वर्ग काहीसा लसीकरणापासून लांबच राहील्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने लसीकरणासाठी कोविन ऍपवर ऑनलाईन नोंदणी करावी लागत असल्याची मोठी अडचण असल्याचे समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी यासाठी पुढाकार घेतला असून झोपडपट्टीमध्ये राहाणार्‍या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे.  

      यासंदर्भात माहिती देताना हेमंत रासने यांनी सांगितले, की शहरातील झोपडपट्टयांमध्ये १८ वर्षे वयावरील नागरिकांची संख्याही मोठी आहे. यामध्ये अगदी अशिक्षीत ज्येष्ठ नागरिकांपासून मोबाईल, इंटरनेट सारख्या माध्यमांची कमतरता यामुळे हे नागरिक ऑनलाईन नोंदणी करू शकत नाहीत. तसेच अनेकांमध्ये लसीकरणाबाबत समज गैरसमजही आहेत. यामुळेही अनेकजण लसीकरणापासून दूर राहात आहेत. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सहकार्‍यांनीही याबाबतच्या तक्रारी सातत्याने मांडल्या आहेत. एकिकडे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची भिती व्यक्त होत असतानाच लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी महापालिकेचे हरप्रकारे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच लसीकरणामध्ये पुणे महापालिका राज्यात सर्वात पुढे आहे. लसीकरणाचा वेग वाढवून कोरोनाची लाट थोपविण्यासाठी झोपडपट्टी आणि वसाहतींमध्ये राहाणार्‍या नागरिकांचे अधिकाअधिक लसीकरण करण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

      यासाठी झोपडपट्टी आणि वसाहतींमध्ये ऑफलाईन लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासोबतच लसीकरण करावे यासाठीही जनजागृतीची व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. येत्या एक दोन दिवसांत याचे नियोजन करून ‘वस्ती तेथे लसीकरण’ या सूत्रानुसार लसीकरण करण्यात येणार आहे, असेही स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी नमूद केले.

Web Title: Now vaccination drive in Punes slums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app