मिळकत पत्रिकेतील फेरफार नोंदीच्या नोटिसा आता घरपोच; पोस्टासोबत एकत्रीकरण प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 09:04 IST2024-12-07T09:03:54+5:302024-12-07T09:04:09+5:30
जानेवारीपासून पुणे शहरात प्रयोग सुरू

मिळकत पत्रिकेतील फेरफार नोंदीच्या नोटिसा आता घरपोच; पोस्टासोबत एकत्रीकरण प्रक्रिया
पुणे : मालमत्ता पत्रिकेवरील झालेल्या फेरफार नोंदीच्या नोटिसा आता संबंधित खातेदारांना हमखास पोहोचणार आहेत. भूमिअभिलेख विभागाने यासाठी पोस्टासोबत एकत्रीकरण प्रक्रिया केली असून भूमिअभिलेख विभागाकडून या नोटिसा ऑनलाइनच पोस्टाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.
राज्यात मिळकत पत्रिकेत अर्थात प्रॉपर्टीकार्डावर फेरफार करण्याची सुमारे ४ लाख प्रकरणे वर्षभरात केली जातात. त्यापैकी सुमारे ७० टक्के अर्थात ३ लाख प्रकरणे प्रमाणित केले जातात. पत्रिकेवरील नोंद प्रमाणित करण्यासाठी प्रत्येक पत्रिकेवरील किमान चारजणांना भूमिअभिलेख विभागाकडून नोटीस बजावल्या जातात. अशा नोटिसांची संख्या वर्षाला १२ ते १५ लाख होते.
नवीन वर्षात अंमलबजावणी
नोंद करणाऱ्या अर्जदारांसह पत्रिकेवरील सर्व • खातेदारांना त्याची नोटीस बजावण्याची जबाबदारी आता पोस्ट कार्यालयावरच टाकण्यात आली आहे. नोटीस न मिळाल्यास हरकत घेण्यापासून वंचित राहणाऱ्यांचे प्रमाण कमी होऊन खातेदारांना फेरफार कशी झाली हे कळू शकणार आहे.
राज्यातील असा पहिलाच प्रयोग पुणे शहरात सुख् करण्यात आला आहे. येत्या आठवडाभरात हा प्रयोग सबंध पुणे जिल्ह्यात व १ जानेवारीनंतर सबंध राज्यात लागू करण्यात येणार आहे.
वेळेची बचत आणि हमखास नोटीस मिळाल्याची खातरजमा होणार
■ या नोटिसा बजावताना भूमिअभिलेख विभागातील देखभाल सर्वेक्षकाला (मेंटेनन्स सव्र्व्हेअर) नोटीस तयार झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून पाकीटबंद करून पोस्टात टाकण्यास किमान आठवड्याचा कालावधी लागतो.
■ अनेकदा नजरचुकीने काही खातेदारांना नोटीस बजावल जात नसल्याचे प्रकारही घडतात. नोटीस पोस्टात टाकल्यानंतर ती संबंधिताला मिळाली असल्याचा कोणताही पुरावा भूमिअभिलेख विभागाकडे राहत नव्हता.
■ नोंद प्रमाणित करण्यासाठी नोटीस बजावल्यानंतर १५ दिवसांचा अवधी देण्यात येतो. खातेदाराला या अवधीत नोटीस मिळाल्यास तो त्यावर हरकत घेऊ शकतो. मात्र, नोटीस न मिळाल्यास सामाईक मिळकतपत्रिकेत फेरफार करणारा अर्जदार ही नोंद प्रमाणित करून घेत होता.
■ अशावेळी संबंधित खातेदार फेरफारविषयी अनभिज्ञ राहत होता. त्यावर नंतर त्याला हरकत घेता येत नव्हती. र सर्व त्रुटी आता दूर होतील, अशी माहिती भूमिअभिलेख विभागातील सूत्रांनी दिली.