पुण्यात रस्त्यावरून अक्षरश: मृत्यू वाहतोय. तासाभराच्या पावसातच रस्त्याचा नाला होऊन अचानक दुचाकीसह तुम्ही वाहून जाऊ शकता. अचानक एखाद्या अदृश्य ओढ्याची ‘मीठी’ होऊन मोटारीची होडी होते. रस्त्यावरून जाताना झाडाच्या रूपाने मृत्यूच तुमचा ठाव घेऊ शकतो. वाहतूककोंडीमुळे रुग्णवाहिकेलाही रस्ता मिळणे अवघड होऊन रुग्ण दगावू शकतो. एकेकाळी सुरक्षित मानले जाणारे पुणे अक्षरश: विस्कटून गेले आहे.
''विस्कटलेले पुणे तुंबते आहे. पुणेकर धास्तीत जगतोय. उल्हास आणि हर्ष घेऊन येणारा पाऊस पुणेकरांसाठी धोकादायक बनला आहे. गेल्या आठवड्यात मुलाला दहा मिनिटांत पोहोचतो म्हणून फोन करणारा एक पिता सिंहगड रस्त्यावर वाहून गेला. याच ओढ्यात बुडून एका परिचारिकेचा मृत्यू झाला. दिवसभर रुग्णांची सेवा करून त्या घरी चालल्या होत्या. मात्र, त्यापूर्वीच काळाने ओढून नेले. सातारा रस्त्यावर केवळ आंबिल ओढाच नव्हे तर आजपर्यंत गटारी वाटणाºया नाल्यांनीही सोसायट्यांमध्ये राहणाºया नागरिकांना आपले रौद्र रूप दाखविले. रात्रीच्या अंधारात हजारो नागरिकांना साड्यांच्या दोºया करून शेजाºयांनी दुसºया मजल्यावर खेचून घेऊन त्यांचे प्राण वाचविले. आजही पावसाची चिन्हे दिसू लागली की त्यांच्याच नाही तर नातेवाईकांच्याही छातीत धस्स होते. अनेक जण पावसाचा अंदाज दिसला की आपल्या राहत्या घरातून कोठेतरी दुसरीकडे राहायला जातात. पुणेकरांवर आजपर्यंत ही स्थलांतराची वेळ आली नव्हती. अगदी कालच्या बुधवारचीच घटना. पीएमपीच्या ब्रेकडाऊन व्हॅनवर प्रचंड मोठे झाड कोसळले. तब्बल दीड ते दोन तास आतमध्ये अडकलेला चालक तडफडत होता. परंतु, वाहतूककोंडीमुळे त्याला मदत मिळू शकली नाही. भर रहदारीच्या टिळक रस्त्यावर ही घटना घडावी? पुणे ऐवढे असुरक्षित का झालेय? पाच हजार कोटींपेक्षा जास्त अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेला पुणेकरांची ही धास्ती घालविता येऊ नये? मान्य की यंदा पाऊस जास्त होतोय. पण महापालिकेची काही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आहे की नाही? या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय आज विस्कटलेले हे पुणे पुन्हा मार्गावर येणार नाही. ''
धोकादायक वृक्षांची पाहणे करणे शक्यशहरात मागच्याच आठवड्यात मोठा वादळी पाऊस झाला. त्यानंतर तरी वृक्ष प्राधिकरण समितीने शहरात पाहणी करणे गरजेचे होते. मात्र, हे काम केलेच जात नाही. आमच्या समितीचे सचिव हेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचेही प्रमुख आहेत. दोन्ही पदे त्यांच्याकडे आहेत तर वास्तविक अधिक कार्यक्षमेते काम होणे अपेक्षित आहे. - संदीप काळे, सदस्य, वृक्ष प्राधिकरण समिती...........मोठ्या फांद्या कटिंग केल्याशिवाय काढता येत नाही. झाड असेल तर मग त्यासाठी क्रेन लागते. वाहन विभागाला त्यासाठी कळवावे लागते. त्यांच्याकडूनच क्रेन मिळते. बुधवारच्या प्रसंगात आमचे कर्मचारी रात्रभर रस्त्यावर होते. त्यांना क्रेन मिळाली नाही, मात्र त्यामुळे काम थांबवून न ठेवता आम्ही मेट्रोचे काम सुरू होते त्या ठिकाणच्या ठेकेदार कंपनीच्या क्रेन वापरल्या.- प्रशांत रणपिसे, अग्निशमन विभाग प्रमुख......
पुणे : वादळी पावसात रस्त्यांवर तुटून पडलेल्या फांद्या काढण्यात पालिका प्रशासनाला बुधवारी पुर्ण अपयश आले. पाऊस थांबला, रस्त्यांवरचे वाहणारे पाणी ओसरले, मात्र फांद्या रस्त्यावर पडूनच राहिल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. आपत्ती व्यवस्थापन, वृक्ष प्राधिकरण, अग्निशमन व उद्यान या पालिकेच्या चारही विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे वाहनधारक वेठीला धरले गेले.