no pure supply of Facilities in the Shivneri | ‘शिवनेरी’तील सुविधांना घरघर
‘शिवनेरी’तील सुविधांना घरघर

ठळक मुद्दे चार महिन्यांपुर्वी तिकीट दरात कपात करण्यात आल्याने प्रवाशांचा प्रतिसाद आणखी वाढला स्वारगेट व पुणे स्टेशन बसस्थानकातून प्रत्येक १५ मिनिटांला दादरसाठी शिवनेरी बस

पुणे : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील प्रतिष्ठेच्या शिवनेरी बसला पुणे-मुंबईदरम्यान प्रवाशांची पहिली पसंती मिळते. पण अनेक बस जुन्या झाल्याने प्रवाशांना अपेक्षित सुविधा मिळत नाही. अधूनमधुन विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच चाजिंग पॉईंट बंद असणे, पडदे नसणे, खराब आसनव्यवस्था आदी तक्रारींची भर पडत आहे. काहीवेळा रस्त्यातच बस बंद पडण्याचे प्रकारही घडत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
महामंडळाने पुणे-मुंबईदरम्यान प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी व्हावा, यासाठी सुमारे दहा वर्षांपुर्वी शिवनेरी बससेवा सुरू केली. सध्या एसटीच्या पुणे विभागाकडे एकुण ६६ शिवनेरी बस असून त्यापैकी ४६ बस मालकीच्या तर २० बस भाडेतत्वावरील आहेत. या बसच्या माध्यमातून दादर, ठाणे, बोरिवली, औरंगाबाद व नाशिक या मार्गांवर बस धावतात. दररोज दोन्ही बाजुने ३०० हून अधिक फेºया होत आहेत. वातानुकूलित व आरामदायी सेवेमुळे या बसला प्रवाशांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे स्वारगेट व पुणे स्टेशन बसस्थानकातून प्रत्येक १५ मिनिटांला दादरसाठी शिवनेरी बस सोडण्यात येते. ठाण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठीही १५ ते ३० मिनिटांनी बस सुटते. तसेच चार महिन्यांपुर्वी तिकीट दरात कपात करण्यात आल्याने प्रवाशांचा प्रतिसाद आणखी वाढला आहे. 
मात्र, एकीकडे प्रवाशांच्या पसंतीची मोहोर उमटलेली असताना सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. एसटीच्या मालकीच्या बसपैकी अनेक बसचे आयुर्मान ८ वर्षांहून अधिक झाले आहे. तर अनेक बस १२ लाखांहून अधिक किलोमीटर धावल्या आहेत. त्यामुळे या बसमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. वातानुकूलित यंत्रणेत बिघाड होण्याचे प्रकार घडत आहेत. काही बस मार्गावरच बंद पडत आहेत. बसच्या खिडक्यांचे पडदे, आसनांचे कव्हर खराब असल्याचे दिसून येते. जुन्या बसमधील आसनांची स्थितीही ‘आरामदायी’ म्हणावी, अशी नसते. काही बसमधील चार्जिंग पॉईंट जवळपास बंद असल्याची स्थिती आहे. दादर ते स्वारगेटदरम्यान प्रवासासाठी ४६० रुपये तिकीट दर आकारला जातो. या दराच्या तुलनेत सुविधाही चांगल्या मिळाव्यात अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
------------------
सध्याचे शिवनेरी बससेवेचे मार्ग व तिकीट दर
१. पुणे स्टेशन ते दादर (औंधमार्गे) - ४४० रु.
२. पुणे स्टेशन ते दादर (पिंपरी चिंचवड मार्गे) - ४४० रु.
३. स्वारगेट ते दादर - ४६० रु.
४. स्वारगेट ते ठाणे (एरोली मार्गे) - ४४० रु.
५. स्वारगेट ते बोरिवली (सायन मार्गे) - ५२५ रु.
६. स्वारगेट ते बोरिवली (पवई मार्गे) - ५२५ रु.
७. पुणे ते औरंगाबाद - ६५५ रु.
८. पुणे ते नाशिक - ६०५ रु.
---------------------------स्वारगेट आगाराकडील शिवनेरी -
मालकीच्या - १८
भाडेतत्वावरील - ११
एकुण - २९
पुर्नबांधणीसाठी प्रस्तावित - ७
-----------------
शिवाजीनगर आगाराकडील शिवनेरी -
मालकीच्या - २८
भाडेतत्वावरील - ९
एकुण - ३७
पुर्नबांधणीसाठी प्रस्तावित - १४
----------------भाडेतत्वावरील शिवनेरी बसच्या देखभाल दुरूस्तीचे काम एसटीकडे नसते. त्यामुळे त्यांच्या बसबाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असतात. भाडेतत्वावरील बहुतेक बस नवीन असल्याने तक्रारींचे प्रमाण कमी आहे. तर एसटीकडील काही बस जुन्या असल्या तरी त्यांची देखभाल-दुरूस्ती एसटीकडेच आहे. त्यामुळे प्रवाशांच्या फारशा तक्रारी नसतात. काही बस जुन्या असल्याने या बसमध्येच काही असुविधा आढळत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.जुन्या बसची पुर्नबांधणी
एसटी महामंडळाने ८ वर्षांहून अधिक कालावधी झालेल्या शिवनेरी बसची पुर्नबांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पुणे विभागातील सुमारे २० बसचा समावेश आहे. बोपोडी येथील वर्कशॉपमध्ये हे काम होईल. यामध्ये बसची आसने, वातानुकूलित यंत्रणा, इंजिन यांसह आवश्यकतेनुसार बदल केले जाणार आहेत. पुर्नबांधणीनंतर या बस पुन्हा मार्गावर येतील.विभागातील जुन्या शिवनेरी बसची पुर्नबांधणी केली जाणार आहे. या बस एसटीच्या मालकीच्या आहेत. पुर्नबांधणीनंतर बस पुन्हा मार्गावर येतील. आता यापुढे एसटीकडून शिवनेरीसाठी भाडेतत्वावरच बस घेतल्या जाणार आहेत. 
- यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

Web Title: no pure supply of Facilities in the Shivneri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.