पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत चाललं असून, या प्रकरणाशी संबंधित आरोपी निलेश चव्हाण अजूनही फरार असल्याने संताप व्यक्त केला जातो. या प्रकरणात आता पोलिसांच्या भूमिकेवरही संशयाने पाहिले जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरही आरोप होऊ लागले आहेत. विशेषतः कारागृह सेवा सुधार विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे नाव चर्चेत आले असून, त्यांच्यावर हगवणे कुटुंबीयांना पाठीशी घालण्याचा आरोप केला वजात आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे यांनीही जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जालिंदर सुपेकर यांनी मदत केल्यामुळे हगवणे पिता पुत्र इतके दिवस फरार राहू शकले असा आरोप केला जातोय.
दरम्यान वैष्णवीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याच पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी सांगितले की, "या प्रकरणात जालिंदर सुपेकर यांचं नाव माझ्यापर्यंत देखील पोहोचलं आहे. मी त्यांच्याशी वैयक्तिकरित्या बोललो आहे आणि त्यांना याबद्दल सावध केलं आहे. जर त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले, तर सरकार कोणतीही हयगय न करता कारवाई करेल.
जालिंदर सुपेकर यांनीही आपल्यावर होत असलेल्या आरोपांबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं की, "हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक आहेत, मात्र त्यांच्या कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणाशी माझा संबंध नाही. आमच्यात अनेक महिन्यांपासून कोणताही संपर्कही नाही. या गंभीर प्रकरणात माझं नाव अनावश्यकपणे गोवलं जात आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता जनतेचा आणि माध्यमांचा दबाव वाढला असून, सरकारने देखील कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. आरोपी कुणीही असो, कायद्यापुढे सर्व समान असावं, या मागणीसाठी अनेक समाजिक संघटनांनीही आवाज उठवला आहे.