काही झाले तरी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावरील अतिक्रमणे राहणार नाहीत - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:43 IST2025-02-19T13:38:15+5:302025-02-19T13:43:31+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर संवर्धनाची कामे, अतिक्रमण काढण्याची कामे सुरु असून याकरिता शासनाने एक टास्क फोर्स निर्माण केली आहे

काही झाले तरी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावरील अतिक्रमणे राहणार नाहीत - देवेंद्र फडणवीस
जुन्नर: छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्याकरीता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत. म्हणून शिवरायांच्या किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे. शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी, स्वराज्याची राजधानी रायगड तसेच इतर किल्ल्यांवर संवर्धनाची कामे सुरू आहेत. याकरिता शासनाने एक टास्क फोर्स निर्माण केली आहे. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील सर्व अतिक्रमणे काढून टाकण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. काही झाले तरी त्याठिकाणी अतिक्रमणे राहणार नाही. असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्यानंतर मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, बापूसाहेब पठारे, माजी आमदार अतुल बेनके यावेळी उपस्थित होते.
शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला #Pune#Shivneri#ChatrapatiShivajiMaharajJayanti#chiefministerpic.twitter.com/yX1p7vCkwP
— Lokmat (@lokmat) February 19, 2025
फडणवीस म्हणाले, शिवनेरीच्या मातीमध्ये स्वराज्याचे तेज मिळते ते तेज घेऊन आम्ही महाराष्ट्राची सेवा करत आहोत. भारतातील राजांनी मुघलांचे मांडलीकत्व स्वीकारले होते. त्यांच्यापुढे नतमस्तक होत होते. अशा काळात आई जिजाऊंनी शिवराय घडविले. मराठी मुलखात हिंदुस्थानात अत्याचार चालला आहे. या मुलखाला त्यातून बाहेर काढून स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी तुझी आहे असे सांगितले. म्हणून शिवरायांनी तलवार हातात घेतली अठरापगड जातीच्या लोकांना एकत्रित केले. मावळ्यांची फौज तयार केली व देव देश व धर्माची लढाई सुरू करून स्वराज्य स्थापन करण्याचे आत्माभिमान जागृत करण्याचे काम केले. भारताचा आत्माभिमान जागृत करण्याचे काम छत्रपती शिवरायांनी केले.