पुढील दोन आठवड्यात पाऊस सामान्य, विदर्भावरील पाणी संकट कायम, मध्य महाराष्ट्र पाणीदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 22:31 IST2017-09-21T22:20:29+5:302017-09-21T22:31:47+5:30
बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात पुढील दोन आठवड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता नसल्याने देशभरातील पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुढील दोन आठवड्यात पाऊस सामान्य, विदर्भावरील पाणी संकट कायम, मध्य महाराष्ट्र पाणीदार
पुणे, दि. 21 - बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात पुढील दोन आठवड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता नसल्याने देशभरातील पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच, पुढील आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. विदर्भात यंदा आतापर्यंत २३ टक्के पाऊस कमी झाला असून तेथे पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाने पुढील दोन आठवड्यांचा अंदाज गुरुवारी जाहीर केला. १५ ते २१ सप्टेंबर या आठवड्यात देशभरात सरासरीपेक्षा १३ टक्के अधिक पाऊस झाला असला तरी देशाच्या ११ विभागात ६० टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे. त्याचवेळी विदर्भात (७६ टक्के), मराठवाड्यात (३५ टक्के), मध्य महाराष्ट्रात (१३४ टक्के) आणि कोकणात (४१० टक्के) अधिक पाऊस झाला.
पुढील आठवड्यात तामिळनाडू आणि कर्नाटकात काही दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील संपूर्ण आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवसात तुरळक ठिकाणी तर त्यानंतर दोन दिवस अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणातही २३ सप्टेंबरपासून तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे.
१ जूनपासून २० सप्टेंबरपर्यंत झालेला पाऊस (मिमी)
विभाग | प्रत्यक्ष | सरासरी | फरक |
कोकण | ३०६० | २८०९़५ | ९ |
मध्य महाराष्ट्र | ८०१़९ | ६६९़९ | २० |
मराठवाडा | ६१२़२ | ६२८़५ | -३ |
विदर्भ | ६९९़१ | ९१३़५ | -२३ |