परिंचे येथे नवविवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2016 02:43 IST2016-02-15T02:43:35+5:302016-02-15T02:43:35+5:30
सासरच्या छळाला कंटाळून परिंचे येथील कांचन गणेश मोरे (वय २० ) या नवविवाहितेने शनिवारी तिच्या राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्नानंतर केवळ एक वर्षातच ही घटना घडली .

परिंचे येथे नवविवाहितेची आत्महत्या
सासवड : सासरच्या छळाला कंटाळून परिंचे येथील कांचन गणेश मोरे (वय २० ) या नवविवाहितेने शनिवारी तिच्या राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्नानंतर केवळ एक वर्षातच ही घटना घडली .
सासवड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून कांचन हिचे आजे सासरा बाबू हरिभाऊ मोरे आणि पती गणेश पोपट मोरे यांच्या विरुद्ध भा. दं. वि. क. ३०६,४९८-अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पती गणेश पोपट मोरे यास घटनेनंतर अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक नारायण गीते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन व पंचनामा करून, मृतदेह शवविच्छेदनासाठी सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला; तसेच तिचा पती गणेश मोरे यास त्वरित ताब्यात घेऊन पुढील कोणताही अनर्थ होऊ नये म्हणून सदर घराला टाळे ठोकून घर बंद करून घेतले.
त्यानंतर रात्री ८ वाजता कांचन हिचे आईवडील आणि सुमारे २०० पेक्षा जास्त नागरिकांनी संतापलेल्या अवस्थेत सासवड पोलीस स्टेशनला आले. आत्महत्येमागे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे, असा आरोप करून तिच्यावर, तिच्या सासरी परिंचे येथील घरासमोर अंत्यविधी करण्याची मागणी केली. परंतु, ‘तुमच्या मुलीच्या प्रेताची हेळसांड न करता, तिच्यावर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार करा,’ असे सांगून त्यांची समजूत काढल्याने जमाव शांत झाला.
त्यानंतर कांचनचे वडील सतीश बाबूराव दुर्वे यांनी जावई गणेश मोरे याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. लग्नानंतर वारंवार सासरच्यांकडून पैशांची मागणी केली गेली असून त्यांना यापूर्वी पैसेही दिले होते. तिचा आजे सासरा बापू मोरे वारंवार शिवीगाळ व मारहाण करून त्रास देत असत. घटना घडल्याच्या दिवशी सकाळी ११.२० वाजता फोन करून मला जेवणच नीट करता येत नाही म्हणून ते मारहाण करीत असून, माझे जगणे असह्य करून सोडल्याचे सांगितले होते. त्या वेळी आम्ही मुलीला घेऊन जातो, तिला त्रास देऊ नका, असेही सांगितल्याचे दुर्वे यांनी फिर्यादीत म्हणले आहे.