कुस्तीच्या आखाड्यात पुण्यात पहिल्यांदाच महिला भिडल्या..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 06:55 IST2025-03-15T06:55:51+5:302025-03-15T06:55:58+5:30
पुण्यातील एका गावात जागतिक महिलादिनीच इतिहास घडला.

कुस्तीच्या आखाड्यात पुण्यात पहिल्यांदाच महिला भिडल्या..!
पुणे : जत्रेतील कुस्ती पाहण्यास एकेकाळी महिलांना मज्जाव असलेल्या पुण्यातील एका गावात जागतिक महिलादिनीच इतिहास घडला. पुरुषांची मर्दुमकी असलेल्या कुस्तीच्या आखाड्यात पहिल्यांदाच महिला भिडल्या आणि मुंढवा गावातील जत्रेत महिला कुस्तीची नवी परंपरा सुरू झाली.
गावातील सामाजिक कार्यकर्त्या गौरी पिंगळे यांच्या पुढाकाराने प्रथमच महिला कुस्ती पार पडली. मुंढवा जत्रा योगायोगाने यावर्षी ८ मार्चला आल्याने महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिला गेला.
राष्ट्रीय विजेती सोनाली मंडलिक आणि संजना दिसले यांच्यात झालेल्या या चुरशीच्या लढतीत सोनाली मंडलिक हिने विजय मिळवला. विजेत्या कुस्तीपटूला ५१ हजार रोख आणि मानाची गदा असे पारितोषिक देण्यात आले. त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमामुळे गावकऱ्यांनी २०२५ पासून दरवर्षी महिलांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्याचे वचन दिले आहे, अशी माहिती गौरी पिंगळे यांनी दिली. पिंगळे म्हणाल्या की, महिलांचे सशक्तीकरण आणि सुरक्षितता यासाठी त्यांना लहानपणापासूनच लाल मातीत घडवले पाहिजे. आई-वडिलांनी आपल्या मुलींना संरक्षणाचे धडे द्यावेत, त्यांना आत्मरक्षण शिकवावे तरच महिलांवरील अत्याचार थांबू शकतील.