कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या कोऱ्या 'पुणेरी' पाट्यांनी सजलेली पुण्यनगरी..!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 12:18 PM2020-08-02T12:18:11+5:302020-08-02T12:19:20+5:30

पुणेकरांची ओळख म्हणजे स्वाभिमान आणि शिस्तप्रिय..!

New Puneri nameplate duruing corona in pune city | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या कोऱ्या 'पुणेरी' पाट्यांनी सजलेली पुण्यनगरी..!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या कोऱ्या 'पुणेरी' पाट्यांनी सजलेली पुण्यनगरी..!

googlenewsNext

* सॅनिटायझर फुटपंपाला गाडीचा एक्सलेटर समजून पायानं वारंवार दाबत बसू नये... एकदा दाबल्यानंतर हात साफ करण्यापुरतं चार थेंब पुरेसं सॅनिटायझर येतं... आपल्याला हात साफ करायचे आहेत, अंघोळ करायची नाही

---------

* दुकानात आल्यावर मास्क असताना ‘मला ओळखलंत का?’ वगैरे फालतू प्रश्न विचारू नयेत. चेहरा झाकलेला असताना नुसते डोळे पाहून ओळखायला, आम्ही सीबीआय ऑफिसर नाही.

...किंवा तुमच्या डोळ्यांत डोळे घालून बघायला प्रियकर-प्रेयसीसुद्धा नाही.

-----------

* दुकानात आल्यावर एकदा तरी लांबूनच मास्क काढून चेहरा दाखवा व पुन्हा मास्क घाला. त्यामुळे ओळख पटण्यास मदत होईल आणि पूर्वीची उधारी आहे की नाही, याची शहानिशा करता येईल.

------------

*आमच्याकडे वर्षानुवर्षे दुपारी एक ते चार दुकान ‘लॉकडाऊन’ करण्याची परंपरा आहे. ती आम्ही पाळणारच. या वेळेत उगाच ‘आता लॉकडाऊन उठला आहे, दुकान बंद का ठेवलंत? इतके दिवस बंदच होतं ना...’ वगैरे विचारून अपमान करून घेऊ नये.

-------------

* आमच्याकडे बरोबर सहा फूट लांबीची घडीची काठी मिळेल. ती जवळ ठेवल्यास बाहेर भेटणाऱ्यांशी बरोब्बर अंतर मोजून आणि अंतर राखून बोलता येईल.

-------------

कपड्यांचे दुकान

खरेदीला एकट्यानेच यावे. ट्रायलसाठी परवानगी नाही. ‘ट्रायलरूम नाहीये का,’ असं वारंवार विचारू नये. दोन हजारांची चेंज व कपड्यांचे एक्स्चेंज येथे होत नाही. खरेदी केलेल्या कपड्यावर मॅचिंग मास्क मोफत मागू नये.

-------------

हॉटेलमधील पाटी

येथे ऑर्डरनुसार फक्त पार्सल मिळेल. ‘बडीशेपचंही पार्सल द्या’, अशी मागणी करू नये. वेगळा चार्ज पडेल. (उद्या हात धुण्यासाठी पाणीही पार्सलमध्ये मागाल... अहो घरचे पाणी वापरा)

------------

घरावरील पाटी

* दारावरची बेल वाजवण्यासाठी खाली काठी ठेवली आहे. प्रत्येकाला सॅनिटायझर देणं आम्हाला परवडत नाही. बेल वाजत नसल्यास त्याच काठीनं कडी टूक टूक वाजवत बसू नये.

------------

सोसायटीतील पाट्या

* तरुण मुुला-मुलींनी सोसायटीच्या आवारात परस्परांशी बोलताना सीसीटीव्हीत दिसेल असं सुरक्षित अंतर राखून थोडा वेळ मास्क काढून बोलावे. मास्कमुळे ओळख लपवत पालकांकडून ‘बेनिफिट ऑफ  डाऊट’ घेऊ नये.

------------

* वॉचमनकडून इन्फ्रारेड टेंपरेचर गनद्वारे वारंवार टेंपरेचर तपासत बसू नये. रीडिंग बदलणार नाही. तेवढेच  येते. ऑक्सिमीटरमध्ये वारंवार बोटं घालत बसू नये. तो गुदमरेल.

--------------------------------------------------------------------

- अभय नरहर जोशी  

abhayjoshi27@gmail.com

 

(लेखक 'लोकमत'च्या पुणे आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)

 

Web Title: New Puneri nameplate duruing corona in pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.