पुणे विमानतळावरील पार्किंग शुल्काचे नव्याने ‘उड्डाण’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 12:21 IST2019-03-05T12:17:22+5:302019-03-05T12:21:19+5:30
प्रवाशी वाहनांच्या बेशिस्तीमुळे अनेकदा विमानतळ परिसरामध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

पुणे विमानतळावरील पार्किंग शुल्काचे नव्याने ‘उड्डाण’
पुणे : विमानतळावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने वाहनतळ शुल्काची पुनर्रचना केली असून, त्या अंतर्गत अर्धा तास आणि पुढे तासा तासाने शुल्कामध्ये वाढ होणार आहे. त्यानुसार ४८ तासांसाठी वाहनानुसार १४० ते सहाशे रुपये मोजावे लागतील. तसेच, प्रवाशी वाहनांनी प्रवाशंना वाहनतळावरुन नेण्यात तीन मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेतल्यास त्यांना ३४० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. हा बदल मंगळवारपासून (दि. ५) लागू होत आहे. 
प्रवाशी वाहनांच्या बेशिस्तीमुळे अनेकदा विमानतळ परिसरामध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. येथील वाहतूक सुरळीत व्हावी, वाहन तळावर होणारी वाहनांची अतिरिक्त गर्दी कमी व्हावी यासाठी वाहनशुल्कामध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच, प्रवाशांची ने-आण करणाऱ्या वाहनचालकांसाठी देखील नियमावली तयार करण्यात आली आहे. वाहनतळ क्रमांक एकवर वाहन लावता येईल. त्याचे दर अर्धा तासापासून सुरु होतील. त्यानंतर दीड तासांचे दोन टप्पे, पुढे चार तास, पाच तास, सहा तास, सात तास आणि २४, ३६ आणि ४८ तास या प्रमाणे वाहनतळ शुल्क आकारले जाईल. 
प्रवाशांने घेण्यासाठी वाहनतळ क्रमांक दोनचा वापर प्रवाशी वाहनांनी करावा. त्यासाठी प्रवाशी वाहनांना विमानतळ परिसरात प्रवाशांने घेण्यासाठी प्रवेश शुल्कापोटी ५० रुपये आकारले जातील. प्रवाशांना घेण्यासाठी आणि सामान गाडीत ठेवण्यासाठी ३ मिनिटांहून अधिक वेळ वाहनांना लावता येणार नाही. त्या पेक्षा अधिकवेळ लावणाऱ्या वाहनांना ३४० रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. तसेच, ठरवून दिलेल्या जागे व्यतिरिक्त वाहन लावणे, वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या वाहन चालकांना देखील ३४० रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. सरकारी वाहनांना मात्र, वाहन शुल्कामधून सवलत देण्यात आली असल्याचे विमानतळ प्राधिकरणाने स्पष्ट केले. 
---------------------
असे असेल नवीन वाहनशुल्क
वाहनप्रकार                                      पहिले तिस मिनिट        तीन तास        ७-२४ तास    २४-३६ तास              ४८ तासापर्यंत
कोच, बस, ट्रक, टेम्पो
एसयुव्ही, टेम्पो, कोच, बस                   ४०                                १२०                २००             ४५०                          ६००
कार                                                      ३०                               १०५                १८५             ३८५                          ५१०
दुचाकी                                                 १०                                 ३०                  ७०              १०५                         १४०