डेटिंग साइटवर भेटलेल्या नेहाने ज्येष्ठाला लावला २० लाखांचा चुना, कोरेगाव पार्क परिसरातील घटना
By भाग्यश्री गिलडा | Updated: April 18, 2024 17:47 IST2024-04-18T17:44:06+5:302024-04-18T17:47:10+5:30
दिलेले टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक...

डेटिंग साइटवर भेटलेल्या नेहाने ज्येष्ठाला लावला २० लाखांचा चुना, कोरेगाव पार्क परिसरातील घटना
पुणे : डेटिंग साइटवर ओळख करून एकाला तब्बल २० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राहुल रोसा (वय ५५, रा. कोरेगाव पार्क) यांनी बुधवारी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ९ जानेवारी ते २२ मार्च या कालावधीत घडला आहे. तक्रारदार यांची नेहा शर्मा हिच्याशी एका डेटिंग वेबसाइटवरून ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात रोज संवाद सुरु झाला. एकदा नेहा हिने फिर्यादींना गुंतवणुकीबद्दल माहिती देऊन कॅपिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले.
फिर्यादींनी सुरुवातीला ५० हजार रुपये गुंतवले. त्याचा नफा दिसून येत होता म्हणून नेहा हिने वेळोवेळी पैसे गुंतवण्यास भाग पाडून फिर्यादींकडून एकूण २० लाख ५३ हजार रुपये उकळले. त्यानंतर फिर्यादींनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पैसे काढता येत नव्हते म्हणून नेहा हिला विचारणा केली असता तिने आणखी पैसे भरण्यास सांगितले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादींनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते या करत आहेत.