घाट दुरुस्तीकडे झाले दुर्लक्ष
By Admin | Updated: May 18, 2015 05:40 IST2015-05-18T05:40:24+5:302015-05-18T05:40:24+5:30
येथील मुख्य मंदिराच्या मागील इंद्रायणी नदीचा घाट नऊ महिने उलटून गेले, तरी दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून, याची जबाबदारीही कोणी

घाट दुरुस्तीकडे झाले दुर्लक्ष
देहूगाव : येथील मुख्य मंदिराच्या मागील इंद्रायणी नदीचा घाट नऊ महिने उलटून गेले, तरी दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून, याची जबाबदारीही कोणी घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. आठ ते दहा वर्षांपूर्वी देहूगाव येथे देहू-आळंदी विकास समितीच्या माध्यमातून तीरावर घडीव दगडांचा घाट बांधण्यात आला. त्यानंतर गावात चार वर्षांपासून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार विकासकामांना सुरुवात झाली. मात्र, त्यापूर्वीही शासनाच्या वतीने काही कामे झाली. समितीने प्रवेशद्वार आणि घाट बांधून गावाच्या सौंदर्यात वाढ करण्यास सुरुवात केली.
सध्या विकास आखड्यानुसार पित्ती धर्मशाळेपासून गोपाळपूरदरम्यान घाट बांधण्याचे काम सुरू झाले. सध्या घाटाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याने इंद्रायणीतीरास आगळे सौंदर्य प्राप्त होत आहे. मात्र, मुख्य देऊळवाड्यामागील घाट कोसळल्यानंतर दुरुस्ती न झाल्याने तेथे उलट चित्र दिसत आहे. अवघ्या सात-आठ वर्षांपूर्वी पूर्ण झालेले घाटाचे दगडी काम गतवर्षीच्या पावसाळ्यात कोसळले. संस्थानच्या वतीने घाटाच्या वरील भागात मंदिरातील दगडी टाकण्यात आल्या होत्या. पावसात पाणी जमिनीत मुरले व येथील भराव खचून हा घाट कोसळला, असे बोलले जाते. सलग भिंत खूपच उंच बांधण्यात आली असल्याने दगड व पाणी यांचा दबाव या घाटाच्या भिंतीवर पडल्याने हा घाट पडला असावा, असे काही लोक म्हणतात. काही नागरिक या घाटाचे बांधकाम निकृष्ट झाल्याने पडला असल्याची चर्चा आहे.(वार्ताहर)