दोन मुलांची आई ते वर्ल्ड पॉवर लिफ्टर, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकली ४ सुवर्णपदके

By प्रमोद सरवळे | Published: October 29, 2023 06:00 AM2023-10-29T06:00:01+5:302023-10-29T06:05:02+5:30

वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग स्पर्धेतील मास्टर १ गटात (४० ते ४९ वयोगट) त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक प्राप्त केले....

neeta mehta Mother of two, world power lifter, won 4 gold medals in world championships | दोन मुलांची आई ते वर्ल्ड पॉवर लिफ्टर, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकली ४ सुवर्णपदके

दोन मुलांची आई ते वर्ल्ड पॉवर लिफ्टर, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकली ४ सुवर्णपदके

पुणे : वयाच्या तीशीपर्यंत सर्व स्वप्ने पूर्ण करायची, नंतर लग्न करून आयुष्याचा आनंद घेत जगण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते, पण काही गोष्टी राहून जातात. मग लग्नाच्या काही वर्षानंतर अनेकजण त्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अशीच धडपड करत पुण्याच्या नीता मेहता यांनी पॉवर लिफ्टींग क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावत देशाचा ध्वज फडकावला आहे. वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग स्पर्धेतील मास्टर १ गटात (४० ते ४९ वयोगट) त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक प्राप्त केले.

मंगोलियात ८ ते १५ ऑक्टोबर दरम्यान वर्ल्ड मास्टर पॉवर लिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. ४४ देशांतील स्पर्धक यात सहभागी झाले होते. या स्पर्धेत नीता मेहता या एकमेव महिला ठरल्या, ज्यांनी तब्बल ४ सुवर्ण पदके जिंकली. पॉवरलिफ्टिंगच्या स्क्वॅट, बेंच प्रेस आणि डेडलिफ्टचा अशा तीनही प्रकारात त्यांनी सुवर्ण जिंकलेच, पण महिलांच्या ४७ किलो वजनी गटातही सुवर्ण पदकाला गवसणी घातली. स्क्वॅटमध्ये ९२.५ किलो, बेंच प्रेसमध्ये ५० किलो आणि डेडलिफ्टमध्ये १२० किलोंचे वजन उचलले. एकूण २६२.५ किलो वजन उचलून व्यावसायिक पावरलिफ्टरलाही अशक्यप्राय असणारा विक्रम त्यांनी या क्षेत्रात केला.

पॉवर-लिफ्टिंग क्षेत्रात पदार्पण कसे झाले?

कार्पोरेट सचिवपदाची पदवीधर, गृहीणी असलेल्या मेहता यांना दोन मुले आहेत. पॉवर लिफ्टींग जगात त्यांनी पाहिले पाऊल ठेवले ते २०१९ मध्ये. फक्त ४ वर्षात त्यांच्या नावावर २० हून अधिक सुवर्ण पदके आहेत. विविध ठिकाणी होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धा, एशिया पॅसिफिक स्पर्धा, नॅशनल, इंटर नॅशनल स्पर्धा आणि अशा प्रत्येक पॉवर लिफ्टिंगच्या स्पर्धेत त्यांनी भारताचे केवळ प्रतिनिधीत्व केले नाहीतर अनेक सुवर्ण पदके मिळवली. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आपण आपले स्वप्न यशस्वीपणे साकार करू शकतो याचा एक आदर्शच नीता मेहता यांनी घडवला. गृहिणी म्हणून घरातील सर्व जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडत त्यांनी यश मिळवले हे विशेष. ४६ व्या वर्षी पॉवर लिफ्टींग जगतातले २ राष्ट्रीय विक्रम मोडीत काढणाऱ्या त्या एकमेवर महिला ठरल्या आहेत.

देशाचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नीता मेहता यांना गौरविण्यात आले
देशाचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नीता मेहता यांना गौरविण्यात आले

आधीची कामगिरीही चमकदार

  • २०१९ मध्ये अल्माटी, कझाकिस्तान येथे झालेल्या आशियाई क्लासिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व.
  • हाँगकाँग इथे झालेल्या आशियाई पॅसिफिक आफ्रिकन क्लासिक चॅम्पियनशिपमध्ये स्क्वॅट आणि बेंच प्रेस प्रकारात कांस्यपदक आणि क्लासिक बेंचप्रेस चॅम्पियनशिपमध्ये चॅम्पियनशिप सुवर्ण पदक.
  • २०२१ इस्तंबूल, तुर्की येथे ५ सुवर्ण पदके आणि २ सर्वोत्तम लिफ्टर्स ट्रॉफी.
  • २०२२- कॉमनवेल्थ क्लासिक पावर लिफ्टींग चॅम्पियनशिपमध्ये १ सुवर्ण ४ रोप्य, स्ट्राँग वुमन, ऑकलंड न्यूजीलंड
  • २०२३ जून- एसियन अफ्रिकन पॅसिफिक क्लासिक पावर लिफ्टींग चॅम्पियनशिपमध्ये दोन ब्रान्ज ( हाँगकाँग)
  • २०२३ वर्ल्ड पावर लिफ्टींग चॅम्पियनशिपमध्ये, उलान बटोर मंगलिया- चार सुवर्ण

 

संपूर्ण शाकाहारी 


मी १५ वर्षापूर्वी जीम लावण्याचा उद्देश तंदुरस्ती होता. ट्रेनरच्या सल्ल्यानंतर पावर लिफ्टिंगमध्ये आले. त्यानंतर आतापर्यंत २० हून अधिक सुवर्ण पदके जिंकली. पती आणि मुलांनीही मला नेहमी प्रोत्साहन दिले. कोरोनाकाळात घरीच माझी एक लहान जीम तयार केली. तिथेच मी पावर लिफ्टींगची तयारी करत होते. मी सकाळी साडे सहा वाजता उठते. स्वतः ट्रेनर असल्यामुळे सकाळी ऑनलाईन ट्रेनिंग सेशन घेते. त्यानंतर साडे दहा ते दोन पर्यंत ट्रेनिंगसाठी जिमला जाते. नंतर सायंकाळीही मी ट्रेनिंग देते. पूर्णपणे शाकाहारी आहे.
- नीता मेहता (आंतरराष्ट्रीय, पावर लिफ्टर)

Web Title: neeta mehta Mother of two, world power lifter, won 4 gold medals in world championships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.