गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 08:37 IST2025-08-17T08:35:33+5:302025-08-17T08:37:04+5:30
"राज्यातील खासगी कारखाने राज्याबाहेरील लोकांचे असल्याने त्यांना स्थानिकांशी आस्था नाही."

गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: "दिवसेंदिवस सहकारी चळवळीला सुरुंग लागत आहे. खासगी कारखान्यांचे प्रस्थ वाढत असून, ते पाहून अस्वस्थता वाढत आहे. कारखान्यांबाबत समस्या निर्माण झाल्यास चर्चा कुणाशी करावी, असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यातील खासगी कारखाने राज्याबाहेरील लोकांचे असल्याने त्यांना स्थानिकांशी आस्था नाही. त्यातच या कारखान्यांची गाळपक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे कमी क्षमतेचे सहकारी कारखाने टिकणे अवघड झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने गाळप क्षमतेबाबत विचार करावा आणि याबाबत धोरण ठरवावे," अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. साथी किशोर पवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शनिवारी पुण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
कमी कामगारांमध्ये काम
पवार म्हणाले, "उत्तर प्रदेशात खासगी साखर कारखाने वाढत असून तीच स्थिती महाराष्ट्रातही आहे. सहकारी कारखाने दिवसेंदिवस कमी होत आहेत. खासगी कारखान्यांमध्ये कमीतकमी कामगारांमध्ये काम करण्याची प्रथा सुरू झाली आहे. कारखाने टिकले पाहिजेत, मात्र, कारखान्यात घाम गाळणाऱ्या कामगारांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे काय, याचा विचार करावा लागेल."