निमोणे : शेतकरी कुटुंबासाठी शेती हे उदरनिर्वाहाचे महत्वाचे साधन असते. बळीराजा शेतीकडे जिवापेक्षा जास्त लक्ष देऊन सांभाळ करत असतो. शेतीच्या बाबतीत कुठलीही समस्या त्यांना चालत नाही. अशातच शिरूर तालुक्यात लताबाई भास्कर हिंगे या शेतकरी महिलेची आगळीवेगळी मागणी समोर आली. महिलेला शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे महिलेने चक्क हेलिकॉप्टरची मागणी केली आहे.
हिंगे यांनी शिरुर तहसिल कार्यालयात रस्ता मागणीचा अर्ज केला होता. त्या अर्जावर तत्कालीन तहसीलदार यांनी एका तारखेची सुनावणी घेऊन संबंधित मंडळ अधिकारी यांना स्थळ पाहणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु आदेश प्राप्त झाल्यापासून मंडळ अधिकारी यांनी कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. शेतकरी लताबाई हिंगे यांनी बऱ्याच वेळा त्यांच्या कार्यालामध्ये स्थळ पाहणी करण्यासाठी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अनेकवेळा आपले काम सोडुन हेलपाटे मारुनही ते महाशय त्यांना भेटले नाहीत. यावेळी त्यांना मोठा मनःस्तापही सहन करावा लागला .
त्यानंतर काही दिवसांनी लताबाई हिंगे आणि संबंधित मंडळ अधिकारी यांची भेट झाल्यानंतर मंडळ अधिकारी यांनी "लवकर स्थळ पाहणी करतो", "मला सध्या वेळ नाही", "मी नवीन बदली होऊन आलेलो आहे" अशी कारणे देत गेल्या अनेक दिवसांपासुन स्थळ पाहणी करण्यास टाळाटाळ केली. हिंगे यांच्या शेतामध्ये पिक काढणीला आलेले असतानाही त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे तयार शेतमाल बाहेर काढायचा कसा असा प्रश्न त्यांना सतावतो आहे. शिवाय शेती हाच कुटुंबाचा एकमेव उदरनिर्वाहाचे साधन असल्यामुळे सर्वच काही ठप्प झाले. त्यामुळे नाईलाजाने शेतकरी लताबाई हिंगे शेतमाल बाहेर काढण्यासाठी मला हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी त्यांनी शिरूर तहसिदार यांचेकडे शासकीय अनुदान किंवा आर्थिक मदत मिळावी असा अर्ज केला आहे. दरम्यान या मागणीची सर्वत्र चर्चा होत आहे. यातुन अनेक शेतकऱ्यांची शेतीसाठी रस्त्याचा प्रश्न किती बिकट व लाल फितीचा कारभार किती वेळ काढुपणाचा आहे याचा प्रत्यय येतो.