राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार मतदार संघाच्या बैठकांचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 03:17 PM2019-09-20T15:17:58+5:302019-09-20T15:22:36+5:30

पाच वर्षांपासून सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे.

NCP taken series of meetings in the four Constituency | राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार मतदार संघाच्या बैठकांचा धडाका

राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार मतदार संघाच्या बैठकांचा धडाका

Next
ठळक मुद्देतयारीला लागण्याच्या सूचना : जागा वाटपाचा फॉम्यूर्ला ठरल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकांवेळी लढले होते वेगवेगळे

पुणे : शिवसेना-भाजपा युतीचे घोडे चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेले असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र जागा वाटपाचा फॉम्यूर्ला निश्चित केला असून लवकरच पुण्यातील जागांबाबतचा निर्णय घोषित केला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यातील पर्वती, वडगाव शेरी, हडपसर आणि खडकवासला मतदार संघांमधील इच्छूकांसह पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन संबंधितांना तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील जागांचे वाटप निश्चित झाले असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 
पाच वर्षांपासून सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. अनेक नेते आणि पदाधिकारी भाजपा-सेनेत प्रवेश करीत आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपा-सेनेला मिळालेले यश पाहता विधानसभा लढविण्याबाबत विरोधी पक्षांमधून फारसे इच्छूक नाहीत. तसेच कोणी इच्छूक असल्याबाबत प्रबळ दावाही करीत नाही. परंतू, काही जणांनी या परिस्थितीतही शड्डू ठोकून लढण्याची तयारी दर्शविली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जागा वाटपाबाबत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष यांनी १२५-१२५ चा फॉम्यूर्ला ठरला असून 38 जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जागा वाटपावरुन बैठकाही सुरु आहेत. 
पुण्यामध्ये एकूण आठ विधानसभा मतदार संघ आहेत. हे आठही विधानसभा मतदार संघ भाजपाच्या ताब्यात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून आपापल्या सोयी नुसार मतदार संघांची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांपैकी ज्या पक्षाला क्रमांक दोनची मते मिळाली असतील त्यांना तो मतदार संघ सोडावा अशी मागणी केलेली आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये पाच मतदार संघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्या स्थानी होता. तर, काँग्रेस पक्ष तीन मतदार संघांमध्ये दुसºया स्थानी होता. हेच सूत्र जागा वाटप करताना ठरवावे अशी मागणी शहर राष्ट्रवादीकडून केली जात आहे. 
त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीने शहरातील पर्वती, हडपसर, वडगाव शेरी आणि हडपसर मतदार संघांमधील इच्छूकांसह खासदार, माजी आमदार, आजी-माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी, निरीक्षक, प्रदेशावरील पदाधिकारी या बैठकांना उपस्थित होते. पर्वती मतदार संघाची बैठक पक्षाच्या कार्यालयात घेण्यात आली. तर वडगाव शेरी, हडपसरच्या बैठका स्थानिक पातळीवर झाल्या. खडकवासला मतदार संघाची बैठक निसर्ग कार्यालयामध्ये घेण्यात आली. त्यामुळे अन्य मतदार संघामधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून आमच्या मतदार संघांच्या बैठका का घेतल्या नाहीत अशी विचारणा करीत आहेत. 
====
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकांवेळी वेगवेगळे लढले होते. त्यावेळी ज्या पक्षाला क्रमांक दोनची मते ज्या मतदार संघात पडली असतील तो मतदार संघ त्या पक्षाला सोडावा अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे. एकूण पाच मतदार संघांमध्ये राष्ट्रवादी आणि तीन मतदार संघांमध्ये कॉंग्रेसला क्रमांक दोनची मते मिळाली होती. त्याअनुषंगाने आम्ही बैठका घेत आहोत. दोन्ही पक्षांची आघाडी झाली असून पक्ष आणि वरिष्ठ नेते जागा वाटपाबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. त्यानुसार, आघाडी धर्म पाळत सर्वजण काम करतील. 

Web Title: NCP taken series of meetings in the four Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.