'राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा, शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, सभागृहात हशा पिकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 18:59 IST2024-04-11T18:55:29+5:302024-04-11T18:59:12+5:30
Sharad Pawar On Raj Thackeray : राज ठाकरेंच्या या निर्णयावर खासदार शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

'राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा, शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, सभागृहात हशा पिकला
Sharad Pawar On Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडव्या दिवशी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला. या निर्णयानंतर राज ठाकरे यांच्यावर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता राज ठाकरेंच्या या निर्णयावर खासदार शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांचा पुणे जिल्ह्यात भाजपाला धक्का; धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रवेशावरही पवार म्हणाले,...
" गेल्या १० ते १५ वर्षात राज ठाकरेंचे ३, ४ निर्णय मी बघितले आहेत,असा टोलाही पवार यांनी ठाकरेंना लगावला. "कधी भाजपाबाबत एकदम तिखट प्रतिक्रिया दिली आणि बाजूला झाले. कधी पाठिंबा दिला. त्यांना नक्की काय करायचं होतं हे मला सांगता येणार नाही. त्यांनी कशाचीही अपेक्षा न करता पाठिंबा दिला आहे. बघू दोन तीन दिवसात काय ते स्पष्ट होईल. त्यांनी असा निर्णय का घेतला हे राज ठाकरेच स्पष्ट करु शकतील, असंही शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, अनेक संस्था काम करत असतात, एजन्सीज काम करत असतात त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला का? हे काही मला माहीत नाही. यावेळी पत्रकारांनी पवारांना राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत सामान्य माणसं संभ्रमात आहेत असं शरद पवारांना विचारलं असता “मी पण सामान्य नागरिक आहे” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. यावर सभागृहात हशा पिकला.
राज ठाकरे पाडवा मेळाव्यात काय म्हणाले?
गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मी सगळ्या गोष्टींकडे बारकाईने पाहतो तेव्हा पुढच्या पाच वर्षांसाठी काही गोष्टी ठरवाव्या लागतील. मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं राज्यसभाही नको, विधान परिषद नको. पण देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देते आहे हे मी जाहीर करतो, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली.