Navale Bridge Accident : नवले पूल अपघातांचा गुन्हेगार आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 12:53 PM2022-11-25T12:53:11+5:302022-11-25T12:54:12+5:30

पुण्यातील नवले पुलाजवळची अपघातांची मालिका काही थांबायला तयार नाही...

Navale Bridge Accident Who is the culprit of Navale Bridge truck accidents pune latest news | Navale Bridge Accident : नवले पूल अपघातांचा गुन्हेगार आहे तरी कोण?

Navale Bridge Accident : नवले पूल अपघातांचा गुन्हेगार आहे तरी कोण?

googlenewsNext

पुणे : नवले पुलाजवळची अपघातांची मालिका काही थांबायला तयार नाही. कात्रज बोगद्याकडून रस्त्याला असलेला तीव्र उतारच अपघाताला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. काही सरकारी यंत्रणांनीही त्याला दुजोरा दिला आहे. खुद्द विभागीय आयुक्त सौरभ राव यांनीही जाहीरपणे या अपघातांना महापालिका आणि एनएचएआयच जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले आहे. यातील महापालिका मात्र हा भाग आमच्याकडे येऊन फक्त १० महिने झाले, असे सांगत आहे. या अपघाताची जबाबदारी महापालिकेची नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

एनएचएआय म्हणते...रस्ते बांधणारे नव्हे; बेशिस्त वाहनचालकच गुन्हेगार!

नवले पुलाजवळ होणारे अपघात रस्ता चुकीचा बांधल्याने किंवा तीव्र उतार असल्याने नाही तर बेशिस्त व अप्रशिक्षित वाहनचालकांमुळे होतात. त्यामुळे अपघातांचे खरे गुन्हेगार तेच आहेत, अशी स्पष्ट भूमिका भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय- नॅशनल हायवे ॲथाॅरिटी ऑफ इंडिया) यांनी घेतली आहे. अपघात होऊ नयेत यासाठीची सर्व काळजी रस्त्याच्या विकसकाकडून घेतली जाते, असा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला.

रस्ते प्राधिकरणाने नाकारली जबाबदारी

‘एनएचएआय’चे व्यवस्थापक अंकितकुमार यांनी गुरुवारी दिवसभर नवले पूल परिसरातील अतिक्रमणे काढण्याच्या कामात होते. तिथून फोनवर बोलताना त्यांनी सांगितले की, अपघातासंदर्भात ‘एनएचएआय’ला जबाबदार धरणे चुकीचे आहे. कोणताही रस्ता मनात आला आणि हवा तसा बांधला, असे होत नाही. त्यामागे अभियंत्यांचा, त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अभ्यास असतो. चढ, उतार किती कसावा, त्यावरून कोणती वाहने, किती संख्येने ये-जा करतात या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. हा अभ्यास केल्यानंतरच रस्त्याचे काम सुरू होते.

आरोपात तथ्य नाही : अंकितकुमार

बेशिस्त वाहनचालकच या अपघातांना जबाबदार आहेत, असे अंकित कुमार म्हणाले. या मागे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, वेग मर्यादा न पाळणे, रात्रीच्या वेळेस गाडी भरधाव पळवणे अशी कारणे आहेत. जड वाहने महामार्गांवरून चालवताना बरेच नियम असतात. अपघात झालेले कोणतेही वाहन पाहिले तर या नियमांचा भंग झाल्याचे लक्षात येते. त्यामुळे रस्ता चुकीचा बांधला आहे, या आरोपात काहीही तथ्य नाही, असे अंकितकुमार यांनी सांगितले.

विकासकाचाही संबंध नाही

बांधा, वापरा व हस्तांतर कर (बीओटी- बील्ट इट, ऑपरेट इट, ट्रान्सफर इट) या तत्त्वावर हा रस्ता बांधला गेला. तरीही जो कोणी विकासक असेल त्याच्यावर फायनल ॲथाॅरिटी म्हणून प्राधिकरणाचेच नियंत्रण असते. आम्ही विकासकाला अपघातांसंदर्भात अनेक पत्रे पाठवली आहेत, असा दावा अंकितकुमार यांनी केला. दिशादर्शक फलक लावणे, अपघातप्रवण क्षेत्रात रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या रेडियमच्या सावध करणाऱ्या खुणांचे फलक लावणे यासंबंधी वारंवार कळवण्यात आले. त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही देखील केली आहे. रम्बलर्स वगैरे उपाय तर कायमच केले जातात, अशी माहिती अंकितकुमार यांनी दिली.

प्रकल्प संचालकांशी संपर्क नाही

‘एनएचएआय’चे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याशी दिवसभरात संपर्क होऊ शकला नाही. त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ येत होता. त्यांना पाठवलेल्या मोबाइल संदेशाला प्रतिसाद मिळाला नाही. अंकितकुमार हे या रस्त्यावर असलेली अतिक्रमणे काढण्याच्या मोहिमेत होते. तिथूनच ते मोबाइलवर बोलले.

Web Title: Navale Bridge Accident Who is the culprit of Navale Bridge truck accidents pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.