पुणे : कात्रज ते नवले पूल या टप्प्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केवळ पुलाचा तीव्र उताराचा भाग कमी करणे शक्य नसून त्यावर उपाय म्हणून त्याच टप्प्यात राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या रिंगरोडचे काम तातडीने पूर्ण करण्याचा पर्याय पुढे आला आहे. महामंडळाच्या रिंगरोडच्या पश्चिम भागातील उर्से ते शिवरे या टप्प्यातील रिंगरोडमधील शिवरे ते कासार अंबोली या दरम्यान २२ ते २५ किलोमीटर रस्त्याचे काम एका वर्षात पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. जेणेकरून साताऱ्याकडून येणारी जड वाहने नवले पुलावर न येता थेट मुंबई एक्स्प्रेस वेला जातील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
नवले पुलाजवळ गुरुवारी (दि. १३) झालेल्या भीषण अपघातात आठ जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या सरकारच्या विविध विभागाकडून तातडीने उपयोजना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यावर जिल्हाधिकारी डुडी यांनी शुक्रवारी (दि. १४) ही माहिती दिली. ते म्हणाले,‘‘रस्ता सुरक्षा समितीने २०२२ मध्ये नवले पुलाजवळील अपघात कमी करण्यासाठी विविध उपयोजना सुचविल्या होत्या. त्या सर्व उपयोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. साताऱ्याकडून येताना नवले पुलाजवळ तीव्र उतार आहे. तो कसा कमी करता येईल, यावर दोन दिवसांपूर्वीच चर्चा झाली होती. परंतु तो कमी करणे शक्य नाही, असे महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. त्यावर उपाय म्हणून दोन पर्याय पुढे आले आहेत. सुतारवाडी ते रावेत आणि जांभूळवाडी ते रावेत दरम्यान दोन उड्डाणपूल उभारणे, हा एक पर्याय आहे. त्याचा आराखडा तयार करून तो केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. केंद्र सरकराच्या उच्चाधिकार समितीच्या मान्यतेनंतर तीन महिन्यांत त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे सहा हजार ५३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. परंतु हे काम पूर्ण होण्यास किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यावर महामार्ग प्राधिकरणाकडून कार्यवाही सुरू आहे.’’
यावर तोडगा काढण्यासाठी त्याहीपेक्षा कमी कालावधी रिंगरोडचा पर्याय पुढे आहे, असे डुडी यांनी या वेळी स्पष्ट केले. महामंडळाने पश्चिम भागातील रिंगरोडचे काम सुरू केले आहे. उर्से ते कासार अंबोली दरम्यान ६४ किलोमीटरच्या या टप्प्यात खेडशिवापूर टोलनाक्याच्या पुढे शिवरेपासून कासार अंबोली दरम्यानचे २२ ते २५ किलोमीटर रिंगरोडचे काम प्राधान्याने पूर्ण करणे. रिंगरोडसाठी भूसंपादन यापूर्वीच झाले आहे. त्यामुळे हे काम एक ते दीड वर्षात पूर्ण होऊ शकते, हा दुसरा पर्याय पुढे आला. पुढील आठवड्यात मंगळवारी (दि. २५) या संदर्भात महामंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात येणार असून प्रत्यक्ष जागेवरही पाहणी करण्यात येणार आहे, असेही डुडी म्हणाले. हे काम झाल्यावर साताऱ्यावरून येणारी सर्व जड वाहने नवले पूल मार्गे न येता थेट पौड येथील कासार अंबोली येथून पुणे मुंबई एक्स्प्रेस वे येथे जातील, असेही ते म्हणाले.
गेल्या तीन वर्षांत अपघातांची संख्या
वर्ष – अपघात – प्राणांतिक – गंभीर – किरकोळ
२०२२ – २८ – ७ – १० – ५
२०२३ – २५ – ९ – ६ – ४
२०२४ – १० – ४ – ३ – १
एनएचएआयच्या उड्डाण पुलाव्यतिरिक्त राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंगरोडचे या टप्प्यातील काम पूर्ण केल्यास वाहतुकीचा भार मोठ्या प्रमाणावर कमी होईल. त्यादृष्टीने महामंडळाला या टप्प्यातील काम सुरू करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी
Web Summary : To curb Navale Bridge accidents, the ring road will be prioritized. The Urse-Shivare section's 22-25 km stretch will be completed in a year. Heavy vehicles will then bypass the bridge, easing congestion.
Web Summary : नवले पुल दुर्घटनाओं को रोकने के लिए रिंग रोड को प्राथमिकता दी जाएगी। उर्से-शिवरे खंड का 22-25 किमी हिस्सा एक साल में पूरा किया जाएगा। भारी वाहन पुल को बाइपास करेंगे।