पुणे : नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातास जबाबदार असलेल्या कंटेनर चालकासह तिघांविरोधात सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपघातास जबाबदार असणाऱ्या कंटेनरचालकासह क्लीनरचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी कंटेनर चालक रुस्तम ऋदार खान (३५, रा. किरवारी, किसनगड, जि. खेरतल, राजस्थान), क्लीनर मुस्ताक हनीफ खान (३१, रा. मनापुरी, रासगड, जि. अलवर, राजस्थान) आणि कंटेनर मालक ताहीर नासीर खान (वय ४५, रा. किसनगड, राजस्थान) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस उपनिरीक्षक मधुकर तुुपसौंदर यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ‘अपघातात कंटेनरचालक रुस्तम आणि क्लीनर मुस्ताक यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अशी माहिती परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. अपघातास जबाबदार असणाऱ्या कंटेनरचालकासह तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०५, २८१, १२५ (अ) (ब), ३२४ (४), मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून आणि ब्रेक नादुरुस्त होऊन नवले पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. या कंटेनरने १० ते १२ वाहनांना धडक दिल्यामुळे लागलेल्या आगीत आठजणांचा होरपळून मृत्यू झाला; तर १५ ते २० जण गंभीररीत्या जखमी झाले. गुरुवारी (दि. १३) नवले पुलाजवळील सेल्फी पॉइंटजवळ हा अपघात झाला. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांसह सिंहगड रोड पोलिस, वाहतूक पोलिस, अग्निशमन विभागाने तातडीने बचावकार्य सुरू केले.
अवजड साहित्य घेऊन कंटेनर साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. नवले पुलावरील सेल्फी पॉइंटजवळ कंटेनरचालकाच्या वाहनाचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे त्याने रांगेत असलेल्या पुढील वाहनांना धडक देण्यास सुरुवात केली. जवळपास छोट्या-मोठ्या मिळून १० ते १२ वाहनांना कंटेनरने उडवल्यामुळे वाहनांना आग लागली. दोन कंटेनरच्या धडकेत कार चेपली गेल्यामुळे त्यातील प्रवाशांना गाडीतून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. कंटेनरसह इतर वाहनांतील मिळून आठजणांचा मृत्यू झाला. भरधाव वेग आणि ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.कंटेनरचालकाने अनेक वाहनांना धडक दिल्यामुळे आग लागली होती. चालकांसह प्रवासी गाडीतच अडकल्यामुळे ते मदतीसाठी आरडाओरडा करत होते. मात्र, आगीचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरल्यामुळे कुणालाच त्यांच्या मदतीसाठी पुढे जाता येत नव्हते. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाहनांतील प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
नवले पुलावर नेमका कसा अपघात झाला, या दृष्टीने तपास सुरू आहे. ट्रकचालकाने मद्यप्राशन केले होते का?, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. भरधाव वेगामुळे नियंत्रण सुटल्याने कंटेनरने एकापाठोपाठ वाहनांना धडक दिली असून, पोलिसांकडून नवले पुलाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे.
Web Summary : A major accident on Navale Bridge resulted in eight deaths. Police suspect drunk driving by the container driver, who died in the fire. A case has been filed against three individuals, including the deceased driver and cleaner, for reckless driving and causing the accident.
Web Summary : नाले पुल पर भीषण दुर्घटना में आठ लोगों की मौत हो गई। पुलिस को संदेह है कि कंटेनर चालक ने शराब पी रखी थी, जिसकी आग में जलकर मौत हो गई। लापरवाह ड्राइविंग और दुर्घटना का कारण बनने के लिए मृतक ड्राइवर और क्लीनर सहित तीन लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है।