टिळकांना दहशतवादी ठरवणे हा राष्ट्रीय गुन्हा : डॉ. श्रीपाल सबनीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 21:42 IST2018-05-11T21:42:38+5:302018-05-11T21:42:38+5:30
राजस्थानमधील वसुंधरा राजे सरकारच्या साक्षीने आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या इंग्रजी पुस्तकात ‘लोकमान्य टिळक हे दहशतवादाचे जनक होते’ असा निंदनीय मजकूर प्रसिध्द झाला आहे.

टिळकांना दहशतवादी ठरवणे हा राष्ट्रीय गुन्हा : डॉ. श्रीपाल सबनीस
पुणे : राजस्थानमधील वसुंधरा राजे सरकारच्या साक्षीने आठवी इयत्तेच्या समाजशास्त्र विषयाच्या इंग्रजी पुस्तकात ‘लोकमान्य टिळक हे दहशतवादाचे जनक होते’ असा निंदनीय मजकूर प्रसिध्द झाला आहे. टिळकांसारख्या देशभक्ताला दहशतवादी ठरवण्याचा करंटेपणा विद्वानच करत असेल तर समाजाने कोणावर विश्वास ठेवावा, असा परखड सवाल माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे उपस्थित केले आहे.
देशभक्ताला दहशतवादी ठरवताना राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीतील सर्वच स्वातंत्र्य योध्दयांचा अवमान झाला आहे. स्वराज्याच्या हक्काचा व्यक्तिगत आणि सामूहिक जाहीरनामा ब्रिटिश राजवटीच्या विरोधात देशभर प्रसारित करणारे टिळक हे अस्सल देशभक्त आहेत. त्यांचे देशप्रेम तुरुंगातील शिक्षा भोगूनही उजळून निघाली आहे. तरीही त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर दहशतवादाचा कलंक लावणे, हा इतिहासासह सत्याचा आणि स्वातंत्र्य चळवळीचा द्रोह आहे. सत्याच्या नावे विकृती पेरणे हा सांस्कृतिक गुन्हा असून, राजस्थान सरकारने संबंधित लेखकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सबनीस यांनी या पत्राद्वारे केली आहे.