आचारसंहिता संपताच मंचर होणार नगरपंचायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:17 IST2020-12-05T04:17:16+5:302020-12-05T04:17:16+5:30
मंचर : आचारसंहिता संपताच मंचर नगरपंचायतीला परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे. मंचर नगरपंचायत ...

आचारसंहिता संपताच मंचर होणार नगरपंचायत
मंचर : आचारसंहिता संपताच मंचर नगरपंचायतीला परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.
मंचर नगरपंचायत होणेबाबत शहरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन दिले. तसेच या बाबत सविस्तर चर्चा केली.
आंबेगाव तालुक्यातील मंचर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी कांदा, भाजीपाला, कापड तसेच सोन्याचांदीची मोठी बाजारपेठ आहे. मंचर शहर व परिसरात अनेक दूध प्रकल्प, शासकीय अभियांत्रिकी कॉलेज, शासकीय तंत्रनिकेतन, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय आहेत. यामुळे तालुक्यातून तसेच जुन्नर, खेड, शिरूर व इतर भागातूनही या ठिकाणी नागरिकांची सतत वर्दळ असते. येथे बटाटा बियाणाची प्रसिद्ध बाजारपेठ असल्याने खरेदीसाठी शेतकरी मंचर या ठिकाणी सतत येत असतात. मंचर शहराने नुकताच ९० हजार लोकसंख्येचा टप्पा ओलांडला आहे.
शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या ठिकाणी शुद्ध पिण्याचे पाणी, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच इमारत बांधकामामध्ये सुसूत्रता, प्रशस्त रस्ते, वाहनतळ व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृह, अग्निशमन बंब आदी प्रकल्प राबविणे ग्रामपंचायतीला अडचणीचे होत आहे. यामुळे येथे नगरपंचायत होणे अत्यावश्यक आहे. या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची वेगळ्या विषयावर गुरुवारी मंत्रालयात बैठक होती. या बैठकीमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मंचर नगरपंचायतीबाबत त्यांची भेट घेतली. यावेळी सविस्तर चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचेबरोबर मंचर नगरपंचायतीबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. आचारसंहिता संपताच मंचर नगरपंचायतीला परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा केली. यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार, राजाबाबू थोरात, जे. के. थोरात, सुहास बाणखेले, लक्ष्मण थोरात, अल्लू इनामदार आदी उपस्थित होते.
फोटोखाली: मंचर येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले.