गुढीपाडव्यापासून ‘दगडूशेठ’ चा संगीत महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 20:44 IST2018-03-13T20:44:42+5:302018-03-13T20:44:42+5:30
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सवाची सुरुवात १८ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता भिमण्णा जाधव व सहका-यांच्या मंगलध्वनी, सुंद्रीवादनाने होणार आहे.

गुढीपाडव्यापासून ‘दगडूशेठ’ चा संगीत महोत्सव
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमीदरम्यान १८ ते २५ मार्च पर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ७ ते १० यावेळेत विविध दर्जेदार सांगितिक कार्यक्रमांची होणार आहे. गुढीपाडव्याला सायंकाळी ७.३० वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.
संगीत महोत्सवाची सुरुवात १८ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता भिमण्णा जाधव व सहका-यांच्या मंगलध्वनी, सुंद्रीवादनाने होणार आहे. सोहळ्याला विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर जितेंद्र भुरुक, रेवती मुखर्जी यांच्या ‘तुम आ गये हो’ हा कार्यक्रम होईल. गुढीपाडव्याला सकाळी ९ वाजता मंदिरामध्ये गुढीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वी सकाळी ८ वाजता मंदिरामध्येच गणेशयाग होणार आहे.
संगीत महोत्सवात सोमवारी (दि.१९) श्रीधर फडके यांचा फिटे अंधाराचे जाळे, मंगळवारी (दि.२०) धनश्री लेले, श्रीपाद ब्रह्मे यांचा पसायदान, लोककला ते आधुनिक संगीत एक प्रवास, बुधवारी (दि.२१) अशोक हांडे व सहका-यांच्या मंगलगाणी दंगलगाणी हा कार्यक्रम होणार आहे. तर, गुरुवारी (दि.२२) सुप्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर यांचा स्वरोत्सव रसिकांना अनुभवता येणार आहे. शुक्रवारी (दि.२३) राहुल सोलापूरकर व जितेंद्र अभ्यंकर यांचा प्रभात ते सैराट चित्रप्रवास, शनिवारी (दि.२४) झी मराठी प्रस्तुत उत्सव नात्यांचा हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ गायक व संगीतकार पं.ह्रदयनाथ मंगेशकर व राधा मंगेशकर यांच्या भावसरगम या स्वरमैफलीने रविवारी (दि.२५) संगीत महोत्सवाची सांगता होणार आहे. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.