पाणीबचतीसाठी महापालिकेचा पुढाकार
By Admin | Updated: July 16, 2014 04:01 IST2014-07-16T04:01:52+5:302014-07-16T04:01:52+5:30
गेल्या दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीचे रेनवॉटर हार्वेस्टिंगचे काम पूर्ण झाले आहे.

पाणीबचतीसाठी महापालिकेचा पुढाकार
हणमंत पाटील, पुणे
गेल्या दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीचे रेनवॉटर हार्वेस्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे ४ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या टेरेसमुळे पावसाळ्यात सुमारे २१ लाख लिटर पाण्याची बचत होणार आहे. पाणी बोअरवेलद्वारे थेट भूगर्भात सोडले जात असून, त्यामुळे बोअरवेलचे पुनर्भरण करण्यात येत आहे.
राज्य शासनाने १० वर्षांपूर्वी सर्व महापालिकांना नवीन इमारतींचे नकाशे मंजूर करताना, रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही महापालिकेच्या पातळीवर रेनवॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी करण्याविषयी उदासीनता होती. पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीसाठीची रेनवॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा धूळखात पडल्याचा प्रकार ‘लोकमत’ने प्रथम उजेडात आणला होता. त्यानंतर तत्कालीन आयुक्त महेश पाठक यांनी राज्य शासनाच्या आदेशानुसार रेनवॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी तातडीने करण्याविषयीचे परिपत्रक काढले होते. त्यानंतर माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या निधीतून २५ लाख व महापालिकेचे २० लाख असा ४० लाख रुपयांचा रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या चारही बाजूला सुमारे ४००० चौरस मीटर क्षेत्र आहे. पुण्यातील पावसाची वार्षिक सरासरी ६२५ मिलिमीटर आहे. त्यानुसार संपूर्ण पावसाळ्यात मिळून २१ लाख लिटर पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेद्वारे संकलित होणार आहे. इमारतीच्या उत्तर व दक्षिण भागातून पाणी संकलित होऊन थेट बोअरवेलमध्ये सोडण्यात येत आहे. ही बोअरवेल २०० फूट खोल आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगचे पाणी बोअरवेलद्वारे भूगर्भात सोडले जात आहे. त्यामुळे पुनर्भरण झालेल्या बोअरला महापालिकेची फायर फायटिंग यंत्रणा जोडण्यात येणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत संबंधित पाण्याचा उपयोग आग विझविण्यासाठी करण्यात येणार आहे, असे उपअभियंता अभिजित डोंबे यांनी सांगितले.