अॅमेनोरा, सिझन मॉलवर महापालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 21:27 IST2018-03-22T21:27:14+5:302018-03-22T21:27:14+5:30
शहरातील जाहिरातींसाठी महापालिकेचे आकाशचिन्ह आणि परवाना धोरण २००३ तयार केलेले असून त्यास राज्यशासनानेही मान्यता दिलेली आहे.

अॅमेनोरा, सिझन मॉलवर महापालिकेची कारवाई
पुणे : महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी न घेता सर्रास जाहिरातबाजी करणा-या अॅमेनोरा मॉल आणि सिझन मॉलवर थेट कारवाई करत सर्व जाहिरात फलक जमीनदोस्त करण्यात आले. शहरातील अशा २२ मॉलधारकांना नोटिसा बजविण्यात आल्या असल्याची माहिती आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख तुषार दौंडकर यांनी दिली.
शहरातील जाहिरातींसाठी महापालिकेचे आकाशचिन्ह आणि परवाना धोरण २००३ तयार केलेले असून त्यास राज्यशासनानेही मान्यता दिलेली आहे. या मान्यतेनुसार, महापालिकेकडून शहरात जाहिरात करण्यास प्रति चौरस फूट २२२ रुपये शुल्क आकारून मान्यता दिली जाते. या धोरणातील तरतूदीनुसार, शहरातील दुकानदारांना आपल्या व्यवसायाची जाहिरात योग्य पध्दतीने करता यावी यासाठी दुकानाच्या दर्शनी भागातील लांबीएवढी आणि ३ फूट उंचीची जाहिरात लावण्यास मुभा दिली जाते. मात्र, त्यासाठीही आकाशचिन्ह विभागाची परवानगी आवश्यक आहे. परंतु शहरातील बहुतेक सर्व मॉल, हॉटेल्समध्ये आपल्याच इमारतीवर, समोरच्या जागेत प्रचंड मोठ्या प्रमाणात जाहिरात बाजी सुरु आहे. यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सर्व मॉलधारकांना महापालिकेच्या वतीने नोटिसा देण्यात आल्या, पण महापालिकेच्या नोटिसांना केराची टोपली दाखविण्यात आली. अखेर आकाशचिन्ह विभागाच्या वतीने थेट कारवाई करत सर्व जाहिरात फलक जमीनदोस्त करून टाकले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती, असे दौंडकर यांनी सांगितले.
-------------
मार्च अखेरमुळे अधिक कडक कारवाई
शहरातील विविध २२ मॉलच्या बाहेर अनधिकृतपणे जाहिरातबाजी सुरु आहे. या सर्व मॉलवर कडक कारवाई करून , मार्च अखेरपूर्वी परवाना शुल्क व दंड वसूल करण्यात येणार असल्याचे आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख तुषार दौंडकर यानी स्पष्ट केले. महापालिकेला यामधून किमान १० कोटी रुपयांचा महसूल गोळा होईल, असे दौंडकर यांनी सांगितले.