पुना हॉस्पिटलला महापालिकेकडून नोटीस; २४ तासांच्या आत खुलासा करावा अन्यथा कारवाईचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 08:01 PM2020-06-05T20:01:12+5:302020-06-05T20:12:00+5:30

कोरोनाग्रस्तांवर तातडीने उपचार करा; पालिकेची खासगी रुग्णालयांना तंबी

Municipal Corporation notice to Poona Hospital for refusing to admit and treatment on Corona suspected patients | पुना हॉस्पिटलला महापालिकेकडून नोटीस; २४ तासांच्या आत खुलासा करावा अन्यथा कारवाईचा इशारा

पुना हॉस्पिटलला महापालिकेकडून नोटीस; २४ तासांच्या आत खुलासा करावा अन्यथा कारवाईचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देया घटनेचा खुलासा २४ तासांच्या आत करावा अन्यथा कारवाई करण्याचा आयुक्तांचा इशारारुग्ण परत पाठविण्याच्या घटनांमध्ये झाली वाढकोरोनाग्रस्तांना तात्काळ दाखल करुन घेत त्यांच्यावर उपचार करण्याचे आवाहन

पुणे : कोरोना संशयित रुग्णांना दाखल करुन घेण्यास आणि उपचारास नकार दिल्याने पुना हॉस्पिटलला महापालिकेने नोटीस बजावली असून हे कृत्य बेजबाबदारपणाने व वैद्यकीय पेशाला लाजविणारे असल्याचे सडेतोड मत नोटिसीमध्ये नोंदविण्यात आले आहे. या घटनेचा खुलासा २४ तासांच्या आत करावा अन्यथा कारवाई करण्याचा इशाराच पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे.

कोरोनाग्रस्तांना तात्काळ दाखल करुन घेत त्यांच्यावर उपचार करण्याचे आवाहन पालिकेने वारंवार खासगी रुग्णालयांना केले आहे. काही रुग्णालये मात्र पालिकेच्या आणि प्रशासनाच्या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता लावताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी पालिकेने रुबी हॉल क्लिनिकलाही नोटीस बजावली होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड येथील ६० वर्षीय पुरुष आणि पर्वती पायथा येथील ७५ वर्षीय महिलेला पुना हॉस्पिटलने दाखल करुन घेण्यास नकार दिला होता. हे दोघेही गुरुवारी पुना हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल होण्याकरिता गेले होते. तेव्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. तांबोळकर यांनी या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल होण्याबाबत सांगितले. तसेच उपचारास नकार दिला. त्यानंतर हे रुग्ण ऑटो रिक्षाने धनकवडी येथील भारती हॉस्पिटलमध्ये गेले.  यासंदर्भात पालिकेकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
या दोन्ही रुग्णांची वैद्यकीय तपासणी करुन घेणे, त्यांना योग्य ती औषधे देणे, त्यांना आयसीयुमध्ये ठेवणे अपेक्षित होते. तसेच त्यांच्या आजाराचे गांभिर्य पाहून उपचार करणे आवश्यक होते. आयसीयू बेड उपलब्ध नसतील तर कोणत्या रुग्णालयात ते उपलब्ध आहेत याची  'डॅशबोर्ड'द्वारे माहिती घेऊन अद्ययावत रुग्णवाहिकेमधून तिकडे पाठविणे अपेक्षित होते. परंतू, रुग्णालय प्रशासनाने अतिशय हलगर्जीपणा दाखवित रुग्णांची हेळसांड केली. हे कृत्य बेजबाबदारपणाचे आणि वैद्यकीय पेशाला लाजविणारे असल्याचे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. 

.................................

कोरोनाग्रस्तांवर तातडीने उपचार करा; पालिकेची खासगी रुग्णालयांना तंबी

कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने पालिकेच्या रुग्णालयांमधील खाटा पुर्ण क्षमतेने भरल्या आहेत. त्यामुळे, पालिकेने खासगी रुग्णालयांसोबत करार करुन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करुन घेतली आहे. परंतू, अद्यापही बरीचशी रुग्णालये खाटा रिकाम्या नसल्याचे कारण पुढे करीत रुग्णांवर उपचार करण्याचे टाळत आहेत. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा सर्व खासगी रुग्णालयांच्या संचालक, व्यवस्थापकांना पत्र पाठवित रुग्णांवर तातडीने उपचार करण्याची तंबी दिली आहे.
सामान्य आजारी व्यक्तींना, नागरिकांना उपचार मिळविण्याकरिता अडचणी येत आहेत.

शहरातील सर्व रुग्णालये, नर्सिंग होम यांना जाहिर आवाहन करुनही कोरोनाग्रस्तांना तसेच अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी पालिकेकडे नागरिक, नगरसेवक आणि राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांकडून येत आहेत. विविध कारणे सांगून रुग्णास अन्य रुग्णालयांमध्ये पिटाळण्यात येत आहे. ही बाब गंभीर स्वरुपाची असल्याचे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला असून वेळोवेळी अधिसूचनाही निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. कोरोनाग्रस्तांना जी रुग्णालये दाखल करुन घेणार नाहीत किंव्बा उपचाराच्या सुविधा उपलब्ध करुन देणार नाहीत तसेच अन्य आजारी व्यक्तींनाही उपचार देणार नाहीत अशा रुग्णालयांवर यापुढे थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त गायकवाड यांनी दिला आहे.
======

Web Title: Municipal Corporation notice to Poona Hospital for refusing to admit and treatment on Corona suspected patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.