एमपीएससीने वेळापत्रक जाहीर करावे; राज्य सरकारने मागणीपत्र पाठविले नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 05:46 IST2021-04-01T05:44:36+5:302021-04-01T05:46:19+5:30
MPSC Exam : राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) रिक्त पदांचे मागणीपत्रच पाठविले नसल्याने यंदाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

एमपीएससीने वेळापत्रक जाहीर करावे; राज्य सरकारने मागणीपत्र पाठविले नाही
पुणे : राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) रिक्त पदांचे मागणीपत्रच पाठविले नसल्याने यंदाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यावर्षी परीक्षा होणार आहेत की नाहीत, या प्रश्नावरून विद्यार्थी चिंतेत आहेत.
सर्वसाधारणपणे एमपीएससीने २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक डिसेंबरमध्येच जाहीर करणे अपेक्षित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने राज्य पूर्व परीक्षा तब्बल पाच वेळा पुढे ढकलून इतिहास रचला आहेच. मात्र, यंदा परीक्षा होणार आहेत की नाहीत, हे स्पष्ट केले नाही. २१ मार्चला परीक्षा घेऊन कोरोनासारख्या संकटातदेखील चांगल्या प्रकारे परीक्षा घेता येते, हे एमपीएससीने दाखून दिले आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता फार काळ विचार न करता संबंधित विभागाच्या रिक्त जागांचे मागणीपत्र एमपीएससीला पाठवावे. त्यामुळे वेळापत्रक जाहीर होऊन अभ्यास करता येईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
काय आहेत समस्या?
कोरोना आणि आरक्षणामुळे गेल्या दोन वर्षांत भरतीप्रक्रिया रखडली.
वय वाढल्याने संधी हुकली.
वय वाढवले जाणार; केवळ घोषणा झाली, मात्र निर्णय नाही.
मानसिक ताण वाढला असून, भविष्य धोक्यात आल्याची भावना.
अनिश्चित भरती प्रक्रियेमुळे आयुष्याचे गणित बिघडले.
काय आहेत अडचणी?
n राज्यसेवा पूर्व परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नसल्याने ११ एप्रिलला होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘ब’ वर लक्ष केंद्रित.
n संयुक्त गट- ‘क’ सेवा परीक्षेची तारीख अद्याप जाहीर नाहीच.
n अपेक्षित गुण मिळाले नाहीत तर पुढे काय करायाचे, हा मोठा प्रश्न.
एमपीएससीने रिक्त जागांचे मागणीपत्र पाठवावे, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तसे लेखी पत्रही दिले आहे. किमान वेळापत्रक जाहीर झाले तर विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करणे सोपे जाईल. - महेश बडे,
एमपीएससी स्टुडंटस राइट्स
एमपीएससीने २१ मार्च रोजी घेतलेली परीक्षा ही २०१९ च्या मागणी पत्रकानुसार होती. २०२० च्या मागणी पत्रकानुसार होणाऱ्या परीक्षांचे काय, हा मोठा प्रश्न आहे.
- मनीषा सानप, परीक्षार्थी