‘एमपीएससी’ म्हणजे घोळात घोळच, निकाल रखडले, परीक्षा लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 02:21 AM2021-03-13T02:21:16+5:302021-03-13T02:21:45+5:30

मनस्तापाची परंपरा : निकाल रखडले, परीक्षा लांबणीवर

‘MPSC’ means confusion, results are stagnant, exams are postponed | ‘एमपीएससी’ म्हणजे घोळात घोळच, निकाल रखडले, परीक्षा लांबणीवर

‘एमपीएससी’ म्हणजे घोळात घोळच, निकाल रखडले, परीक्षा लांबणीवर

googlenewsNext

अमोल अवचिते
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तारीख बदलल्याने गुरुवारी राज्यभरचे विद्यार्थी संतप्त होऊन रस्त्यावर उतरले. मात्र, परीक्षा वेळेत न घेणे, निकाल रखडवणे या प्रकारातून विद्यार्थ्यांना मनस्ताप देण्याची एमपीएससीची परंपराच असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. नियुक्त्या प्रलंबित राहण्याचीही टांगती तलवार असते, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे.  

एमपीएससीने २०१८ आणि २०१९ रोजी घेतलेल्या परीक्षांबाबत गंभीर होण्याची गरज आहे. आरक्षण तसेच न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या परीक्षा सोडून इतर परीक्षांचे तरी निकाल लावावेत. जेणेकरून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा नियुक्तीचा प्रश्न सुटेल. रखडलेल्या मुलाखती पार पडतील, अशी विनंती विद्यार्थी करतात. एमपीएससीने राज्यसेवा २०१९  परीक्षा ४२० पदांसाठी घेतली. या परीक्षेची जाहिरात १० डिसेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध केली. पूर्वपरीक्षा १७ फेब्रुवारी, तर मुख्य परीक्षा १३ ते १५ जुलै २०१९ रोजी घेण्यात आली. अंतिम निकाल १९ जून २०२० रोजी लावण्यात आला. एकूण ४२० पदांपैकी ४१३ उमेदवार निवडण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेला दीड वर्षाचा कालवधी होऊन गेला आहे. शासन नियमानुसार तीन महिन्यांत नियुक्ती देणे बंधनकारक आहे. मात्र, राज्य सरकार मराठा आरक्षणाचे कारण पुढे करत नियुक्ती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

‘एमपीएससी’चे रडगाणे
एक अध्यक्ष आणि एका सदस्यावर कारभार सुरू आहे. रिक्त असलेली चार सदस्य संख्या पूर्ण भरली गेली तर  एमपीएससीला पूर्ण क्षमेतेने काम करता येईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. रिक्त सदस्यांची पदे न भरल्याने केवळ दोन सदस्यांना मुलाखती घ्याव्या लागत आहेत.

 ३८७ उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत
n२०१८ पीएसआय - ३८७ उमेदवारांची निवड झाली. अजून ते प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत. 
nस्थापत्य अभियांत्रिकी २४ नोव्हेंबर २०१९ रोजी सुमारे ११६१ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. निकाल जुलै २०२० मध्ये लावण्यात आला. मात्र, मुलाखती रखडलेल्या आहेत. 
nयाच परीक्षेचा अंतिम निकाल लागला नसतानाही आता २७ मार्च रोजी २०२० ची २१७ पदांसाठी पूर्वपरीक्षा होणार आहे. त्यामुळे आधीच्या परीक्षांची प्रक्रिया पूर्ण न होताच नव्याने परीक्षा घेतली जात आहे.

उत्तीर्ण होऊनही रखडल्या नियुक्त्या 
स्थापत्य अभियांत्रिकी - ३६७१
पोलीस उपनिरीक्षक - २१२७ 
पशुधन विकास अधिकारी - १३०० 
(निकाल घोषित होणे आहे.) 

निकाल लागूनही प्रतीक्षा : संयुक्त पूर्वपरीक्षा गट  ब २०१९ ची ५५५ पदांसाठी घेण्यात आली. मार्च २०२० मध्ये निकाल लागला. मात्र, अजून अंतिम निकाल लागलेला नाही. यात पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी ४६९ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली. मुख्य परीक्षेचा निकाल मार्च २०२० मध्ये जाहीर झाला. मात्र, १५ महिने होऊनही शारीरिक चाचणीसाठी बोलावले नाही. 

n९ सप्टेंबर २०२० सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एसईबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. या निर्णयाने ४१३ पैकी एसईबीसी आरक्षणाचा लाभ घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्तीवर स्थगिती आली; परंतु ४८ विद्यार्थ्यांमुळे इतर संवर्गातील ३६५ विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या कोणतेही कारण न देता रखडवल्या आहेत.

n९ डिसेंबर २०२० रोजी ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने मराठा आरक्षण कायद्याअंतर्गत येणाऱ्या नियुक्त्या वगळून इतर नियुक्त्या देण्यास राज्य सरकारला रोखलेले नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे एसईबीसीव्यतिरिक्त इतर 
उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे, असे एका विद्यार्थ्याने सांगितले.

Web Title: ‘MPSC’ means confusion, results are stagnant, exams are postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.