MPSC Exam | परीक्षार्थींनो तयारी सुरू करा! एमपीएससीकडून तब्बल ८०० पदांची भरती जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 21:48 IST2022-06-23T21:44:00+5:302022-06-23T21:48:50+5:30
राज्यभरातील ३७ केंद्रांवर ८ ऑक्टोबरला हाेणार पूर्वपरीक्षा...

MPSC Exam | परीक्षार्थींनो तयारी सुरू करा! एमपीएससीकडून तब्बल ८०० पदांची भरती जाहीर
पुणे : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाकडून (एमपीएससी) ८०० पदांच्या भरतीची जाहिरात गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा २०२२ यासाठी उमेदवारांना २५ जून ते १५ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत दिली आहे. यामुळे उमेदवारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या परीक्षेत सहायक कक्ष अधिकारी गट ब या संवर्गातील ४२, राज्य कर निरीक्षक गट ब या संवर्गातील ७७, पोलीस उपनिरीक्षक गट ब या संवर्गातील ६०३ आणि दुय्यम निबंधक संवर्गातील ७८ पदांची भरती केली जाणार आहे. दुय्यम निबंधक पदाची भरती प्रक्रिया प्रथम ‘एमपीएससी’मार्फत करण्यात येणार आहे.
एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार राज्यभरातील ३७ केंद्रांवर ८ ऑक्टोबरला पूर्वपरीक्षा घेण्यात येईल. पूर्वपरीक्षेच्या निकालानंतर पात्र उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये किंवा त्यानंतर हाेईल.
संवर्गातील पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होऊ शकतो, तसेच पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीत शासनाकडून अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेतली जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.