पुणे: मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळत नाही, म्हणून मराठी चित्रपट असोसिएशनच्या वतीने नाट्यगृहात चित्रपट दाखविण्याचा प्रयोग केला. तो गेल्या दोन दिवसांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. बालगंधर्व रंगमंदिरात दोन दिवस मराठी चित्रपट दाखविण्यात आले. ते सर्व चित्रपट हाऊसफुल्ल झाले. त्यामुळे पुणेकर रसिकही आनंदाने चित्रपट पाहायला आले.
रसिकांना मराठी चित्रपट पाहायचा असतो; पण मल्टिप्लेक्समध्ये गेल्याने हजारो रुपयांचा चुराडा होतो. एवढे महागडे तिकीट काढून जाणे सर्वांनाच परवडत नाही. त्यामुळे नाट्यगृहांमध्ये ज्यावेळी नाटक नसेल, तेव्हा मराठी चित्रपट दाखविण्याचा प्रयोग पुण्यात राबविण्यात येत आहे. पुणे महापालिकेने बालगंधर्व रंगमंदिरात बुधवारी (दि. २२) आणि गुरुवारी (दि.२३) मराठी चित्रपटांचा महोत्सव आयोजित केला. केवळ एकोणपन्नास रुपयांत मराठी चित्रपट पाहता आला. त्यासाठी रसिकांनी बालगंधर्व रंगमंदिरात जाऊन तिकीट बुक केले. सर्वच चित्रपट हाऊसफुल्ल झाले. यावरून मराठी चित्रपटाला रसिक नाहीत, अशी जी ओरड होते, ती यामुळे दूर झाली. रसिकांना मराठी चित्रपट पाहायचे आहेत, हेच यावरून सिद्ध झाले, अशी माहिती मराठी चित्रपट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली.
दोन दिवसांत ८ हजार प्रेक्षक !
दोन दिवसांमध्ये चित्रपट महोत्सवात १० शो लावण्यात आले होते. त्यामध्ये नवीन मराठी चित्रपट होते. बालगंधर्व रंगमंदिरात तब्बल सात ते आठ हजार रसिकांनी चित्रपट पाहिले. रंगमंदिरात हाऊसफुल्लचे फलक लावावे लागले, अशी माहिती आयोजक बाबासाहेब पाटील यांनी दिली.
चित्रपटाअगोदर राष्ट्रगीत !
चित्रपटगृहामध्ये सुरुवातीला राष्ट्रगीत म्हटले जाते. त्याचप्रमाणे बालगंधर्व रंगमंदिरातदेखील सुरुवातीला राष्ट्रगीत म्हणण्याची काळजी आयोजकांनी घेतली होती.
उपक्रम कायम सुरू ठेवा !
मल्टिप्लेक्सला तीनशे ते चारशे रुपये तिकीट असते. मध्यंतरानंतर खाण्यासाठी पैसे भरावे लागतात. त्यामुळे सात-आठशे रुपये खर्च करावे लागतात. पण बालगंधर्व रंगमंदिरात ४९ रुपयांत चित्रपट पाहायला मिळाला, हा उपक्रम सुरू ठेवावा, अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली.