पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेली आणखी एक किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. ससून रुग्णालयात नुकतीच ३५ वी ‘मदर टू सन लाईव्ह किडनी ट्रान्सप्लांट’ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. या शस्त्रक्रियेत एका आईने आपल्या २२ वर्षीय मुलाला किडनीदान करून त्याला नवजीवन दिले आहे.
शहरातील एका नामांकित महाविद्यालयात विज्ञान शाखेत पदवी शिक्षण घेत असलेल्या तरुणाला जानेवारी २०२३ मध्ये उच्च रक्तदाबामुळे दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले होते. किडनी तज्ज्ञ डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर ७ जानेवारी २०२३ पासून त्याच्यावर नियमित डायलिसिस सुरू करण्यात आले होते. मात्र, खासगी रुग्णालयांत चौकशी केल्यानंतर प्रत्यारोपणासाठी १० ते १५ लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे समजल्याने कुटुंब पूर्णपणे हतबल झाले होते.
रुग्णाचे वडील एका खाजगी संस्थेमार्फत साफसफाईचे काम करत असून केवळ १३ हजार रुपये मासिक वेतनावर कुटूंबाचा गाडा चालवत आहेत. तुटपुंज्या उत्पन्नातून कुटुंबाच्या दैनंदिन गरजाही भागवणे कठीण असताना किडनी प्रत्यारोपणाचा मोठा खर्च त्यांना अशक्यप्राय होता. अशा परिस्थितीत ससूनमध्ये अत्यंत कमी खर्चात किडनी प्रत्यारोप झाल्याने कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना समाजसेवा अधीक्षक सत्यवान सुरवसे व अरुण बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. शासकीय योजना, विविध समाजसेवी संस्था व आर्थिक मदतीच्या पर्यायांची माहिती देत रुग्णाला किडनी प्रत्यारोपणासाठी समुपदेशन केले. रक्ताच्या नात्यातील व्यक्ती किडनी दान करू शकते, हे समजावून सांगितल्यानंतर आईने स्वतःहून मुलासाठी किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.
किडनीरोग तज्ज्ञ डॉ. संदीप मोरखंडीकर व डॉ. निरंजन आंबेकर यांच्या सल्ल्यानुसार सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. आई किडनी दानासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून विभागीय मानवी अवयव प्रत्यारोपण प्राधिकरणाची मान्यता घेण्यात आली.
शनिवार, २७ डिसेंबर २०२५ रोजी ससून रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव, शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. लता भोईर व मानवी अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम प्रमुख डॉ. किरणकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली.
यावेळी औषधी विभागप्रमुख डॉ. हरिदास प्रसाद, डॉ. हर्षल भितकर, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. संदीप मोरखंडीकर, किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. हर्षद तोष्णीवाल, डॉ. विवेक बारेकर, वास्कुलर सर्जन डॉ. शार्दूल दाते, बधिरीकरणतज्ज्ञ तसेच परिचारिका व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. ससूनमध्ये सर्व किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अत्यंत नाममात्र खर्चात केल्या जातात. योजनेबाहेरील औषधे व तपासण्यांसाठी टाटा ट्रस्ट, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी, महावीर मानव सेवा ट्रस्ट, ओसवाल बंधू समाज, मुकुल-माधव फाउंडेशन यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यात येते.
रूग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अत्यंत नाममात्र खर्चात केल्या जातात. योजने बाहेरील औषधे व तपासण्यांसाठी समाजसेवा अधीक्षक कार्यालयामार्फत गरजू रुग्णांना, किडनी किंवा लिव्हर प्रत्यारोपणासाठी सामाजीक संस्थांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यात येते. - डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय.
Web Summary : A mother's selfless kidney donation at Sassoon Hospital saved her 22-year-old son, burdened by kidney failure and financial constraints. The successful transplant, facilitated by affordable healthcare schemes and social support, offered the family hope and a fresh start.
Web Summary : ससून अस्पताल में एक माँ ने अपनी किडनी दान करके अपने 22 वर्षीय बेटे को बचाया, जो किडनी की विफलता और वित्तीय बाधाओं से जूझ रहा था। सफल प्रत्यारोपण ने परिवार को उम्मीद और एक नई शुरुआत दी।