Most cyber attacks in Maharashtra, five cities at greater risk | सर्वाधिक सायबर हल्ले महाराष्ट्रात, पाच शहरांना जास्त धोका

सर्वाधिक सायबर हल्ले महाराष्ट्रात, पाच शहरांना जास्त धोका

पुणे : ‘डिजिटल इंडिया’ म्हणून देशाची ओळख असली, तरी सायबर हल्ल्यांनी अनेकांची झोप उडवली आहे. पुण्यात रोज दहा ते पंधरा सायबर हल्ले होत असून, त्यास ज्येष्ठ नागरिक बळी पडत आहेत. देशात सर्वाधिक सायबर हल्ले महाराष्ट्रात होत आहेत. ग्राहक, व्यवसाय आणि सरकार यांना ‘आयटी’ सुरक्षा व ‘डेटा प्रोटेक्शन’ सुविधा देणाऱ्या ‘क्विक हील टेक्नॉलॉजीस’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

महाराष्ट्र व दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांना २०१९ मध्ये सर्वात जास्त लक्ष्य करण्यात आले. महाराष्ट्रात ३ कोटी ८० लाख, तर दिल्ली एनसीआरमध्ये २ कोटी ५० लाख ‘सायबर थ्रेट’ उघड झाले. पश्चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात यांनाही सायबर हल्ल्यांचा धोका वाढत आहे. नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता व पुणे या शहरांवर सायबर गुन्हेगार लक्ष ठेवून आहेत. देशात रोज २० लाखांहून अधिक ‘सायबर थ्रेट’ उघड झाले.
या अहवालाविषयी संशोधन संस्थेचे संचालक संजय काटकर म्हणाले, खासगी माहिती विकून पैसे कमावण्यासाठी असुरक्षित डिजिटल डिव्हायसेस हॅक केले जातात. त्याकरिता सायबर गुन्हेगार आधुनिक तंत्रांचा वापर करत आहेत. समाजासाठी धोकादायक कारस्थाने केली जातात, अशा ठिकाणी ही माहिती विकली जाते. जागरूकतेचा अभाव, असुरक्षितता व जुन्या आॅपरेटिंग सिस्टिम्स यांमुळे ग्राहक त्यांना सहजपणे बळी पडतात.

वायफाय राऊटर्सवरही हल्ले
डिजिटल धोक्यांपासून वाचण्यासाठी वायफाय राऊटर्स सारखी साधने सुरक्षित असूनही सायबर गुन्हेगारांनी नव्या पद्धतींद्वारे त्यांच्यावरही हल्ले केले. स्मार्ट टीव्ही, फोन, आयपी कॅमेरे यासारख्या स्मार्ट आयओटीवर आधारित डिव्हाइसमधील असुरक्षिततेचाही त्यांनी वापर केला आहे.

स्मार्टफोन असुरक्षित
सायबर गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने ते ओळखणे वा पकडले जाणे अवघड होत आहे. स्मार्टफोन सर्वाधिक असुरक्षित व सायबर गुन्ह्यांना पटकन बळी पडू शकतील अशा डिजिटल डिव्हायसेसपैकी एक आहेत. स्पायवेअर व मालवेअर वापरण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅप्सवर हल्ला करून संवेदनशील माहिती चोरण्याचे प्रयत्न हॅकर्सनी २०१९ मध्ये केले.

Web Title: Most cyber attacks in Maharashtra, five cities at greater risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.