पिंपरीत बहुतांश नागरिक फिरतात विनामास्क, पोलिसांकडून तब्बल ३२४ जणांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 11:18 IST2021-04-22T11:16:22+5:302021-04-22T11:18:10+5:30
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा उद्रेक

पिंपरीत बहुतांश नागरिक फिरतात विनामास्क, पोलिसांकडून तब्बल ३२४ जणांवर कारवाईचा बडगा
पिंपरी :कडक निर्बंध तसेच संचारबंदी असतानाही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. घराबाहेर पडलेल्या बहुतांशी नागरिक मास्क वापरण्याबाबत उदासीन आहेत. अशा पद्धतीने विनामास्क फिरणाऱ्या ३२४ नागरिकांवर पोलिसांनी बुधवारी कारवाई केली.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. शहरात आतापर्यंत १ लाख ९० हजार ९७३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ६५ हजार २४६ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. तर २ हजार ४७६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन सातत्याने केले जात आहे. मात्र काही बेशिस्त नागरिकांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येऊन नियमांचे उल्लंघन केले जात आहे. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई
एमआयडीसी भोसरी (६१), भोसरी (१०), पिंपरी (०३), चिंचवड (३०), निगडी (१२), आळंदी (३२), चाकण (०९), दिघी (१३), सांगवी (१४), वाकड (१४), हिंजवडी (२०), देहूरोड (१३), तळेगाव दाभाडे (१३), चिखली (२१), रावेत चौकी (५२), शिरगाव चौकी (०७), या पोलीस ठाण्यांतर्गत बुधवारी ३२४ नागरिकांवर कारवाई झाली.