लक्ष्मण मोरे -
पुणे : इंग्रजांविरुद्ध धनगर, कोळी, रामोशी आदी उपेक्षित समाजातील तरुणांना संघठीत करुन स्वातंत्र्याचा सशस्त्र लढा उभारणाºया आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंच्या स्मारकाची दुरवस्था झाली आहे. उपेक्षेच्या गर्तेत सापडलेल्या या स्मारकाभोवती घाणीचे साम्राज्य पसरले असून मेट्रोच्या कामगारांसाठी या स्मारकाला लागूनच स्वच्छतागृह तयार करण्यात आली आहेत. देशासाठी तारुण्याची होळी केलेल्या फडकेंच्या स्मारकाच्या नशीबीही काळकोठडीच आल्याचे चित्र याठिकाणी दिसते आहे.
संगम पुलाजवळील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या जुन्या कार्यालयाच्या आवारात हे स्मारक असून सध्या धूळमातीच्या आणि झाडाझुडपांच्या विळख्यात अडकले आहे. या ठिकाणी ब्रिटिश काळामध्ये सत्र न्यायालय होते. फडकेंनी इंग्रजांविरुद्ध बंडाचे निशान फडकावल्यानंतर इंग्रजांनी त्यांना विजापूरनजीक अटक करून १८७९ साली पुण्यात आणले होते. त्यांच्यावर याच सत्र न्यायालयामध्ये खटला चालविण्यात आला. खटला सुरू असताना सार्वजनिक काका फडकेंचे वकीलपत्र घेण्यासाठी धैर्याने पुढे आले. महादेव चिमाजी आपटेंनी न्यायालयात फडकेंची बाजू बेडरपणे मांडली. त्यांचे सहायक वकील म्हणून चिंतामण पांडुरंग लाटे यांनी न्यायालयात फडकेंचा बचाव केला. खटला सुरु असताना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यावर इंग्रजांनी फडकेंच्या बंडात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला होता.
खटला सुरु असताना फडकेंना तेथीलच एका खोलीमध्ये डांबण्यात आलेले होते. १७ जुलै १८७९ ते ९ जानेवारी १८८० या कालावधीमध्ये फडके या कोठडीमध्ये होते. जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची रवानगी एडनच्या कारागृहात झाली. या संपूर्ण लढ्याची साक्षीदार असलेल्या या वास्तूमधील स्मारक मात्र एकाकी उपेक्षा सहन करते आहे.====