Monsoon 2022 | पुढील तीन दिवसांत माॅन्सून कर्नाटकमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 14:13 IST2022-06-01T14:12:24+5:302022-06-01T14:13:01+5:30
पुणे : मॉन्सूनने रविवारी केरळमध्ये धडक दिल्यानंतर त्याच्या पुढील प्रवासास अनुकूल वातावरण आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत मॉन्सून ...

Monsoon 2022 | पुढील तीन दिवसांत माॅन्सून कर्नाटकमध्ये
पुणे : मॉन्सूनने रविवारी केरळमध्ये धडक दिल्यानंतर त्याच्या पुढील प्रवासास अनुकूल वातावरण आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत मॉन्सून केरळमधील उर्वरित भाग, दक्षिण अरबी समुद्र, तामिळनाडूचा आणखी काही भाग, कर्नाटकचा काही भाग, दक्षिण व मध्य तसेच ईशान्य बंगालच्या उपसागराचा भाग तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये वाटचाल करण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या २४ तासांत कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस पडला, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात हवामान मुख्यत्वे कोरडे होते. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील २४ तासांत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर २ व ३ जून रोजी कोकण व गोव्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर मराठवाड्यात व विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
शहरात हलक्या पावसाची शक्यता
पुण्यात सोमवारी हवामान अंशतः ढगाळ होते. शहरात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तर पुढील तीन दिवसांत हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह सौम्य ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.