Raj Thackeray: अयोध्या, बृजभूषण, परप्रांतिय, उद्धव ठाकरे, पवार; पाहा राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 12:36 IST2022-05-22T12:36:46+5:302022-05-22T12:36:59+5:30
बाबरीच्या वेळी अनेक कारसेवकांना मारण्यात आलं. त्यांची प्रेतं फेकली गेली. मला त्यांचंही दर्शन घ्यायचं होतं, असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray: अयोध्या, बृजभूषण, परप्रांतिय, उद्धव ठाकरे, पवार; पाहा राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे!
पुणे- मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. हा दौरा स्थगित का केला यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केलं.
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला. दौरा तुर्तास रद्द झाल्यानं अनेकांना वाईट वाटलं. बाबरीच्या वेळी अनेक कारसेवकांना मारण्यात आलं. त्यांची प्रेतं फेकली गेली. मला त्यांचंही दर्शन घ्यायचं होतं, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे-
- आपल्या सभांना हॉल वगैरे परवडत नाही. पण मी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं एसपी कॉलेज बघा. त्यांनी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही. नदीपात्राचा विषय झाला. पण एकूणच सध्याचं हवामान पाहाता कोणत्याही वेळी पाऊस पडेल अशी चिन्ह दिसतायत. मी म्हटलं निवडणुका नाहीत, काही नाही, उगीच कशाला भिजत भाषण करा.
- येत्या १ तारखेला माझ्या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. कारण कुणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो, की आमचे पत्रकार बांधव कुठला अवयव काढतात काही नेम नाही. म्हटलं आपणच सांगितलेलं बरं.
- राम जन्मभूमीचं दर्शन मला घ्यायचं होतंच, पण जिथे कारसेवकांना मारलं त्या जागेचंही दर्शन घ्यायचं होतं. राजकारणात अनेकांना भावना समजत नाहीत.
- एक कुणीतरी खासदार उठतो आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य तरी आहे का? याला अनेक पापुद्रे आहेत. काही तर असे आहेत, ज्यावर मला बोलताही येणार नाही. महाराष्ट्रातली माझी ताकद हकनाक तिथे अडकली असती. ती मला तिकडे सापडू द्यायची नव्हती. मी म्हटलं टीकाही सहन करायला तयार आहे, पण पोरं अडकू देणार नाही.
- राज ठाकरेंनी माफी मागावी याची आत्ता आठवण झाली? एवढ्या वर्षांनी?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
- मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा आहे. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व. तुम्ही वॉशिंग पावडर विकताय का? हिंदुत्वाचे रिझल्ट हवेत लोकांना. आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना रिझल्ट देतो, असं राज ठाकरे म्हणाले.
- उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट सांगावी, तुमच्या अंगावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का? मराठीच्या मुद्द्यावर असो किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, असंही राज ठाकरे म्हणाले.
- संभाजीनगर नाव होवो की न होवो, मी म्हणतोय ना?... अरे तू कोण आहे? वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी?, असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
- राज ठाकरेंनी राणा दाम्पत्यावरही निशाणा साधला. मातोश्री बंगला काय मशीद आहे का, तिथे जाऊन हनुमान चालीसा म्हणायला? जे लोक मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायला आले, त्यावरून एवढं काही घडलं, त्यांच्यासोबत तुम्ही लडाखमध्ये जेवताय? हे सगळे ढोंगी. 'पक पक पक पक' पुरतंच हिंदुत्व असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं
- आमच्या महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते आणि औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकतात. आम्हाला लाज, शरम वाटत नाही. कारण सत्ताधारीच असे बसलेत. औरंगजेब हा जर शरद पवारांना सुफी संत वाटत असेल तर काय बोलायचं? तुमच्या सोयीसाठी कशाला राजकारण बदलताय?, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
- जो कायदा पाळायला सांगतो, त्याला नोटिसा पाठवल्या जातात. जो कायदा मोडतो त्याच्याशी चर्चा केल्या जातात. राज्यातल्या २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा आल्या, असं राज ठाकरेंनी सांगितलं. तसेच दोन-चार दिवसांत एक महत्त्वाचं पत्र देणार आहे. ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पोहोचलं पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.