मिळकत कर थकबाकी वसुलीच्या कारवाईत दुजाभाव; मनसेचे आरोप

By राजू हिंगे | Updated: February 5, 2025 19:17 IST2025-02-05T19:17:27+5:302025-02-05T19:17:37+5:30

मिळकतकर विभाग प्रमुख माधव जगताप कोणाच्या कृपाशीर्वादाने अशी दुजाभाव करणारी कारवाई करत

MNS alleges malpractices in the recovery of income tax arrears | मिळकत कर थकबाकी वसुलीच्या कारवाईत दुजाभाव; मनसेचे आरोप

मिळकत कर थकबाकी वसुलीच्या कारवाईत दुजाभाव; मनसेचे आरोप

पुणे :पुणे महापालिकेचा मिळकत कर विभाग शहरातील व्यापारी, व्यावसायिक यांची थकबाकी या संस्थेपेक्षा कमी असतानाही त्यांना हेतुपुरस्सर त्रास देऊन दुकाने, कार्यालये सील करत आहे. पण, मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटला जप्तीची नोटीस काढली. पण, प्रत्यक्षात जप्ती केलेली नाही. त्यामुळे मिळकतकर विभाग प्रमुख माधव जगताप कोणाच्या कृपाशीर्वादाने अशी दुजाभाव करणारी कारवाई करत आहेत, असा आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी केला.

पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाला २ हजार ७२७ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे २ हजार कोटी रुपये वसूल झाले आहेत. मिळकतकर विभागाने सुमारे दीड महिन्यापूर्वी सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटला ४८ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे सांगत या संस्थेच्या इमारती जप्त केल्या आहेत, त्यांचा लिलाव केला जाणार असल्याचे जाहीर केले होते.

प्रत्यक्षात एरंडवणे येथील एकाच मिळकतीला जप्तीची नोटीस देण्यात आली आहे. त्यांना पैसे भरण्यासाठी मुदत दिली असता, आता ही मुदत उलटून गेल्यानंतरही कोणतीही कारवाई केली जात नाही. सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटची कर आकारणीही निवासी दराने केलेली आहे, या संस्थेला कोणत्या नियमानुसार निवासी दर लावला आहे? सिंहगड संस्थेवर कारवाई केली नाहीच, पण अन्य मोठ्या थकबाकीदारांवरही कारवाई होत नाही, केवळ छोट्या थकबाकीदारांवर कारवाई होत आहे. ही कार्यपद्धती चुकीची असल्याने याविरोधात आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना भेटून जगताप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

थकबाकी ३२६ कोटी रुपये

सिंहगड संस्थेच्या एकूण १२६ मिळकती असून, त्यांची थकबाकी ही ३२६ कोटी रुपये आहे. पण, न्यायालयाने अनेक इमारतींवर कारवाई करू नये, असे आदेश दिले आहेत. त्यांची आता केवळ ४८ कोटींचीच थकबाकी वसूल करता येते. तसेच, जप्त केलेल्या मिळकतींचा लिलाव करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे, असा आरोप माधव जगताप यांनी केला आहे.

वकिलामार्फत नोटीस बजाविणार

मनसेचे राज्यसरचिटणीस हेमंत संभूस यांनी केलेल्या आरोपांविरोधात वकिलामार्फत नोटीस बजाविण्यात येणार आहे, असे पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले. 

Web Title: MNS alleges malpractices in the recovery of income tax arrears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.