भानुदास पऱ्हाड
शेलपिंपळगाव : खेड तालुक्यातील मांजरेवाडी गावात एका नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा क्रूरपणे खून केल्याची घटना ताजी असतानाच शेलपिंपळगाव हद्दीतील मोहितेवाडी (ता. खेड) येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २६ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान आरोपी आसीम मुलानी (रा. शेलपिंपळगाव) याचेवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
चाकण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, नराधम आरोपी आसिम मुलाणी (वय : २६ वर्षे, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे) याने पीडित अल्पवयीन मुलीवर १६ डिसेंबर २०२४ ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत वारंवार अत्याचार केला आहे. त्याच अनुषंगाने आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेवून वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध जबदस्तीने शरीर संबंध ठेवून झालेला प्रकार कुणाला सांगितला तर तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकण्याची धमकी देत होता.
शनिवारी (दि. २६) पीडित मुलीला ''तुझा वाढदिवस साजरा करतो'' असे म्हणून तिला आबासाहेब हॉटेलमध्ये बोलावून घेवून तेथेही नराधम आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती शरीर संबंध ठेऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीवर अत्याचार झाल्याची बातमी शेलपिंपळगावात पसरताच गावातील तरुणांनी आरोपीस चांगलाच चोप दिला. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच वेळीच चाकण पोलिसांनी हस्तक्षेप करून आरोपीस ताब्यात घेवून अटक केली आहे.
दरम्यान खेड तालुक्यात अत्याचारांची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून शेलपिंपळगाव परिसरात चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी भेट देऊन ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन करून आरोपीला कडक शासन करण्याचे आश्वासन दिले आहे. घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिह गौर, पोलीस उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली असून गावात कोणतीही घटना घडू नये यासाठी चाकण पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगीता कदम करत आहेत.